इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे गेल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आणखी एक झटका बसला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) विराट कोहलीची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तर, चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात द्विशतक ठोकणारा जो रूटने (Joe Root) दोन स्थानांची झेप घेत 3 व्या क्रमांकावर कब्जा केला आहे. जो रूट 883 रेटिंग पॉईंटवर पोहोचला आहे. त्याची 2017 पासूनची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्येही त्याने शतक व दुहेरी शतक झळकावले होते.
जो रूटने तब्बल चार वर्षानंतर विराट कोहलीला मागे टाकले आहे. या क्रमावारीत अव्वल स्थानी असलेल्या केन विलियमसनपासून जो रूट केवळ 36 अंक दूर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 91 धावा करणारा ऋषभ पंत तेराव्या स्थानावर कायम आहे. याचबरोबर मागच्या सामन्यात अर्धशतक करणारा शुभमन गिलने 7 फलंदाजाला मागे टाकत 40 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे देखील वाचा- IND Vs ENG: कर्णधार विराट कोहलीचा तडाखा; सौरव गांगुलीच्या विक्रमाशी केली बरोबरी
आयसीसी कसोटी क्रमवारी (फलंदाज)
पहिला क्रमांक केन विल्यमसनचा आहे. दुसर्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ, तिसर्या क्रमांकावर जो रूट. चौथ्या क्रमांकावर मार्नस लबूशेन, पाचव्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. त्यानंतर बाबर आझम सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सातव्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, आठव्या क्रमांकावर हेन्री निकोल, नवव्या क्रमांकावर बेन स्टोक्स आणि दहाव्या स्थानी डेव्हिड वॉर्नर आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारी (गोलंदाज)
या क्रमवारीत पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टुअर्ट ब्रॉड आहे. त्यापाठोपाठ जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नील वॅग्नर, जोश हेजलवुड, टिम साउथी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा आणि दहाव्या क्रमांकावर जेसन होल्डर आहे.