ICC T20I रँकिंगमध्ये रोहित शर्मा 8 व्या स्थानावर; विराट कोहली, शिखर धवन यांनाही बढती
(Photo Credit: IANS)

भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) यांना नुकत्याच नवीन जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये बढती मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या टी-20 मध्ये कोहलीने नाबाद 72 धावा फटकावल्या. यासह त्याला एक स्थानाची बढत मिळाली आहे आणि यासह त्याने फलंदाजांच्या यादीत 11 व्या स्थानावर झेप घेतली. दुसरीकडे, धवनने दुसऱ्या सामन्यात 40 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 36 धावा करत तीन स्थानाची झेप घेत 13 व्या स्थानावर पोहचला आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा (Rohit Sharma) याचीदेखील बढती झाली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत रोहित चांगली कामगिरी बजावू शकला नाही, पण तो आठव्या स्थानी पोहचला. याच स्थानावर इंग्लंडच्या अलेक्स हेल्स (Alex Hales) देखील विराजमान आहे. रोहित आणि हेल्स, दोन्हींचे गुण एक सामान, 664 आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका मालिका, बांग्लादेशमध्ये तिरंगी मालिका तसेच आयर्लंड तिरंगी मालिका, ज्यात स्कॉटलंड व नेदरलँड्स इतर संघ होते, याच्यानंतर बदल करण्यात आला आहे.

भारतविरुद्ध टी-20 मालिका क्विंटन डी कॉक याच्यासाठीदेखील फायद्याची ठरली. डी कॉकने दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये दमदार फलंदाजी केली आणि 49 व्या क्रमांकावरुन 30 व्या स्थानावर पोहचला. डी कॉकने दुसऱ्या मॅचमध्ये 52 तर तिसऱ्यामध्ये 79 धावांची विजयी खेळी केली होती. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांग्लादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नाबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, स्कॉटलंडचा रिची बेरिंगटन आणि आयर्लंडचा केव्हिन ओ ब्रायन, अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या क्रमांकावर झेप घेतली.

गोलंदाजांच्या यादीमध्ये फिरकीपटू तबरेझ शम्सी याने पहिल्यांदा पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे तर एंडिले फेलुक्वायो ने करिअर-बेस्ट सातवे स्थान मिळवले आहे. बांगलादेश तिरंगी मालिकेतही काही रोचक तथ्य समोर आले. झिम्बाब्वे संघाचा कर्णधार हॅमिल्टन मसाकद्झा खेळातून निवृत्त झाला. झिम्बाब्वेचा सध्याचा सर्वोच्च क्रमांकाचा फलंदाज म्हणून हॅमिल्टन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 22 व्या स्थानी निवृत्त झाला. तर, मालिकेत सात विकेट्ससह अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान पहिल्या दहामध्ये पोहचला आहे.