ICC T20 World Cup 2021: अक्षर पटेलची बदली म्हणून ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूची टीम इंडियात एन्ट्री, IPL सह गाजवलंय ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचं मैदान
विराट कोहली व शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) टी-20 विश्वचषक (World Cup) स्पर्धेपूर्वी मुख्य संघात समाविष्ट केले आहे. यापूर्वी विराट कोहलीच्या 15 सदस्यीय टीम इंडियात (Team India) स्थान मिळालेला अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) आता स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. शार्दूल, सध्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा एक भाग असून त्याने सध्याच्या आयपीएल (IPL) आवृत्तीच्या 15 सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. 15 ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीपूर्वी भारतीय संघाने (Indian Team) केलेला हा एकमेव बदल आहे. भारत 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. निवड समितीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “निवडकर्त्यांना असे वाटले की ते एक वेगवान गोलंदाज आहेत आणि हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाहीत, त्यांना मुख्य संघात एक अष्टपैलू खेळाडू हवा आहे. अक्षर कायम आहे आणि रवींद्र जडेजा जखमी झाला तर तो पुन्हा मुख्य संघात परत येईल. जद्दू खेळत नाही तोपर्यंत अक्षराची गरज भासणार नाही.” (ICC T20 World Cup 2021: गोलंदाजी करण्यात असमर्थ असल्यास Hardik Pandya ची होऊ शकते टीम इंडियातून एक्सिट, ‘हे’ तीन खेळाडू जागा घेण्याचे आहेत प्रमुख दावेदार)

याशिवाय सनरायझर्स हैदराबादचा वेगवान संवेदना उमरान मलिक आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) गोलंदाज हर्षल पटेल दुबईत भारताच्या तयारीत मदत करतील. तसेच कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सलामीवीर व्यंकटेश अय्यर देखील विराट कोहलीच्या युनिटचा भाग असेल. दरम्यान, शार्दूल ठाकूरच्या अलीकडच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. ‘पालघर एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा हा वेगवान गोलंदाज बॉलनेच नाही तर बॅटने देखील संघात मोलाचे योगदान देण्यासाठी सक्षम आहे. हार्दिक पांड्याबद्दल संघात अद्यापही शंका कायम आहे. त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूरचा 15 सदस्यीय संघात सामील करण्यात आला आहेत. दरम्यान, बीसीसीआयने आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया सोबत सराव करण्यासाठी यूएईमध्ये राहणाऱ्या खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे. या खेळाडूंमध्ये आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि के गौतम यांचा समावेश आहे.

भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँड-बाय खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल.