Team India (Photo Credit - X)

WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळविल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत खूपच रोमांचक बनले आहे. सध्या भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी दावेदार आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्याचा सर्वात मोठा दावेदार सध्या दक्षिण आफ्रिका आहे, जो पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या डब्ल्यूटीसी विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित करण्यापासून एक विजय दूर आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर त्याचा मार्ग थोडा कठीण झाला आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test 2024: गाबाच्या मैदानावर आतापर्यंत 'हे' पाच भारतीय खेळाडू राहिले 'शतकवीर', जाणून घ्या कोणी झळकावले पहिले शतक)

टीम इंडिया कसा करणार फायनलमध्ये प्रवेश

खरे तर आता भारताला अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी कांगारू संघाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतील आपले पुढील तीन सामने जिंकावे लागतील. संघाला हे करता आले नाही तर इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. समजा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-3 अशा फरकाने गमावली. अशा स्थितीत संघाला पाकिस्तानवर अवलंबून राहावे लागेल, तसेच शेजारील देशाने प्रोटीज संघाला त्यांच्याच मैदानावर 2-0 ने पराभूत करावे, अशी प्रार्थनाही करावी लागेल.

जर भारताने बॉर्डर-गावस्कर स्पर्धा 3-2 ने जिंकली, तर आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया श्रीलंकेला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करणार नाही, अशी आशा बाळगावी लागेल. एकूणच, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील उर्वरित तीन सामन्यांमध्ये दोन पराभव भारतीय संघाला अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर काढतील.

प्रोटीज संघाला पराभूत करणे पाकिस्तानसाठी कठीण

मात्र, पाकिस्तान संघासाठी हे कठीण काम असेल, कारण दक्षिण आफ्रिका घरच्या मैदानावर खूप मजबूत आहे. टीम इंडियासाठी एवढेच पुरेसे नाही. पाकिस्तानच्या विजयाव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने त्यांच्या घरी खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एका सामन्यात श्रीलंकेला पराभूत करावे अशीही संघाची इच्छा आहे.

एकेकाळी भारत होता आघाडीवर

काही महिन्यांपूर्वी अशी वेळ आली होती जेव्हा टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात आघाडीवर होती. मात्र गेल्या पाचपैकी चार कसोटीत पराभव झाल्यानंतर समीकरण पूर्णपणे बदलले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या तीनपैकी दोन कसोटी सामने जिंकले आणि एक अनिर्णित राहिली, तर कांगारूंनी श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली तरी त्याला पहिल्या दोनमध्ये स्थान मिळण्याची संधी आहे.