Hardik Pandya (Photo Credit : Yogen Shah)

अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि के एल राहुल (KL Rahul) यांना दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यास BCCI ने बंदी घातली आहे. त्यामुळे दोघेही ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्युझीलॅंड (New Zealand) दौऱ्याला मुकले आहेत. 'कॉफी विथ करण 6' (Koffee with Karan 6) मधील महिलांबद्दल केलेल्या व्यक्तव्यांमुळे दोघांवर चौफेर टीका झाली. त्यानंतर प्रकरणाने गंभीर रुप घेतले आणि त्यांच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली. हार्दिक पंड्याला दुसरा धक्का, खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द, जिलेटनेही रद्द केला करार

पण अलिकडे हार्दिक पांड्याच्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले की, "ऑस्ट्रेलियातून परत आल्यापासून हार्दिकने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. तो कोणाचेही कॉल्स घेत नाही. फक्त एका जागी पडून आहे."

"गुजरातचा रहिवासी असलेला हार्दिक मकर संक्रांतीत पतंगबाजीच्या खेळातही सहभागी झाला नाही. 25 वर्षात असे हे पहिल्यांच घडले. खरं तर अनेक वर्षांनी तो सणाच्या दिवशी घरी होता. मात्र तरिही तो सेलिब्रेशनमध्ये कुठेच नव्हता. पतंग उडवायला त्याला आवडत असले तरी क्रिकेटच्या सरावातून त्याला गेली अनेक वर्षे पतंगबाजीसाठी वेळ मिळाला नव्हता. यंदा संधी होती पण प्रतिकूल परिस्थितीमुळे सण साजरा करण्याचा त्याचा मूडच नव्हता. काल त्याने भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहिला आणि आराम केला." असे पांड्याच्या वडिलांनी सांगितले.

"शो मध्ये केलेल्या व्यक्तवावरुन तो स्वतःच खूप नाराज आहे आणि पुन्हा अशी चूक करणार नाही," असे हिंमाशू पांड्या यांनी मुलाची बाजू घेत सांगितले. "आम्ही मात्र त्याच्याशी या विषयावर बोलणं टाळतो. त्याचा मोठा भाऊ क्रुणालनेही त्याच्याशी या विषयावर चर्चा केली नाही," अशी माहितीही त्यांनी दिली.

कॉफी विथ करण मधील महिलांबद्दलच्या वादग्रस्त विधानांनतर त्यांना सोशल मीडियातही चांगलेच ट्रोल करण्यात आले. त्यानंतर माफी मागूनही BCCI ने त्यांच्यावर कारवाई केली.