संक्रांत टळेना! हार्दिक पंड्याला दुसरा धक्का, खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द, जिलेटनेही रद्द केला करार
Hardik Pandya | (Image courtesy: facebook)

कॉफी विथ करण ( Koffee with Karan) या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यापासून क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या पाठी लागलेली वादाची आणि त्याच्या परिणामाची संक्रात अद्यापही टळण्याचे नाव घेईना. वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदीची कुऱ्हाड कोसळल्यावर हे प्रकरण मिटेल अशी आशा होती. मात्र, त्याचे हे वक्तव्य गांभीर्याने घेत मुंबईतील खार जिमखाना (Khar Gymkhana) प्रशासनानेही त्याचे सदस्यत्व काढून घेतले. त्यामुळे हे प्रकरण अद्यापही कायम असल्याचे दिसते. ऑक्टोबर 2018 पासून तो या जिमखान्याचा मानद सदस्य होता.

दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्याच्या लोकप्रियतेचा आपल्या उत्पन्नाच्या ब्रँडींगसाठी विविध कंपन्या वापर करुन घेत. त्यांच्या जाहीरातींमधूनही हार्दिक झळकत होता. मात्र, तिथेही त्याचे वक्तव्य आड आले. 'जिलेट' या कंपनीने हार्दिकसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्यामुळे हार्दिकच्या एका वक्तव्यामुळे सुरु झालेली तोट्याची मालीका अद्यापही सुरुच आहे.

दरम्यान, हार्दिक पंड्याचे सदस्यत्व रद्द केल्याबद्दल माहिती देताना खार जिमखाना सहसचिव गौरव कपाडिया यांनी सांगितले, राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या सदस्यांना आम्ही जिमखान्याचे सदस्यत्व देतो. आमच्या जिमखान्याचे फेसबुक अकाऊंट आहे. त्याचे सुमारे 4000 पेक्षाही अधिक सदस्य आहेत. हार्दिकने वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद सुरु झाला. या पार्श्वभूमिवर हार्दिकच्या या वक्तव्यावर काहीतरी पावले उचलायला हवीत अशी जोरदार मागणी केली. त्यानंतर महिलांच्या भावनांचा विचार करत आम्ही त्याचे मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापकीय समितीची बैठक सोमवारी पार पडली त्यात हा निर्णय घेतल्याचे कपाडीया यांनी सांगितले. (हेही वाचा, हार्दिक पांड्या, केएल राहुल यांची संघातून हकालपट्टी)

कॉफी विथ करण कार्यक्रमात बोलताना हार्दिकने काही वादग्रस्त विधाने केली होती. या वेळी बोलताना त्याने 'अनेक मुलींना एकच मेसेज पाठवण्यात मला काहीही अडचण नाही. मी त्यांच्या उपलब्ध असण्याबद्दल खुलेआम चर्चा करतो. आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. महत्त्वाचे म्हणजे ही बाब माझ्या पालकांना माहिती होती. मी जेव्हा माझे कौमार्य गमावलं तेव्हा मी आज करुन आलोय असे माझ्या आई-वडीलांना सांगितलं होतं.', असं वक्तव्य हार्दिक पंड्या याने केले होते. त्याच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्याच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियातून त्याच्यावर प्रचंड टीका करण्यत आली. ज्याचे पडसाद आजूनही उमटत आहेत.