Test Cricket मध्ये या तीन कर्णधारांनी आपल्या नेतृत्वासोबत बॅटनेही केला कहर, झळकावली आहेत सर्वाधिक शतके
ग्रीम स्मिथ आणि विराट कोहली (Photo Credit: Facebook)

Captains with Most Test Centuries: कर्णधारपदाची जबाबदारी घेणे काही विशिष्ट फलंदाजांसाठी लाभदायक ठरते आणि दबाव हाताळण्याच्या दृष्टीकोनातून त्यांची इतरांपेक्षा यशस्वी होण्याची प्रवृत्ती असते. आंतराष्ट्रीय स्तरावर कसोटी क्रिकेट (Test Cricket) खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. काहींचे ते स्वप्न पूर्ण होते तर काहींची कारकीर्द प्रतिक्षेतच संपुष्टात येते. काही खेळाडूंनी मेहनत करून देशासाठी कसोटी संघात आपले स्थान कायम ठेवले आहेत. तसेच स्थान कायम ठेवण्यासोबत त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने प्रभावित करत संघाचे कर्णधारपद देखील मिळवले आहेत. मात्र, कर्णधारपदाचा दबाव पेलण्यात काही यशस्वी झाले तर काहींच्या पदरी निराशा आली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे काही कर्णधार आहे ज्यांनी संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारी सोबतच बॅटने विरोधी संघावर हल्लाबोल केला आणि रेकॉर्ड-ब्रेक शतके झळकावली आहेत. आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या टॉप-3 कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत. (Cricket History: क्रिकेट इतिहासातील हे जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं आहे कठीण)

ग्रीम स्मिथ (Greame Smith)

दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथचे नाव या यादीत आघाडीवर आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात संघाचे फक्त नेतृत्वच केले नाही तर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचीही नोंद केली. 2002 मध्ये कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या स्मिथला वयाच्या 22 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आणि कर्णधार म्हणून 193 डावात त्याने 25 शतके ठोकली आहेत.

विराट कोहली (Virat Kohli)

कोहलीने सुद्धा दिग्गजांच्या यादीत आपले नाव प्रस्थापित केले आहे. 32-वर्षीय कोहलीने 2014 मध्ये कसोटी संघाच्या नेतृत्वाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि यामुळे प्रदीर्घ स्वरूपात त्याच्या कामगिरीला नक्कीच चालना मिळाली. कर्णधार म्हणून कोहलीने 98 डावात 20 शतके ठोकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या शतकांचा दुष्काळ संपवून कोहली अगदी थोड्याच वेळात स्मिथचा रेकॉर्ड मोडून यादीत अव्वल स्थान पटकावेल असे शक्यता सध्या दिसत आहे.

रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting)

ऑस्ट्रेलियाचा दोनदा वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंगने माजी कर्णधार स्टीव्ह वॉच्या पावलावर पाऊल ठेवले आणि अजून प्रभावी कामगिरी करत 140 डावात 19 कसोटी शतके केली. पॉन्टिंग हा सर्वात आक्रमक कर्णधार होता आणि ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य संघ त्याच्या कर्णधारपदाच्या 2004 ते 2011 काळात जवळजवळ अपराजित होता. एकूणच, त्याने कसोटींमध्ये 41 शतके आणि 62 अर्धशतके झळकावली असून कसोटी क्रिकेटमध्ये कांगारू संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.