अनिल कुंबळे आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढाई सुरूच आहे. या व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी भारतीय क्रीडा सुपरस्टार्स मदतीसाठी पुढे येत आहेत. क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरपासून विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा यांनी सरकारला आर्थिक मदत पुरवली आहे. मंगळवारी माजी कर्णधार आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनीही कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली. कुंबळे यांनी मंगळवारी कोरोना व्हायरसविरूद्ध लढ्यात पंतप्रधान मदत निधी आणि कर्नाटक राज्य मदत निधीला (Karnataka CM Relief Fund) देणगी दिल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे कुंबळे यांनी कर्णधार विराटचा मार्ग अवलंबला. कुंबळे यांनी दोन खात्यांना पैसे दान केले. या महान क्रिकेटपटूने ट्विटद्वारे याबद्दल माहिती दिली, मात्र इतर क्रिकेटर्सप्रमाणे त्यानेही रक्कम जाहीर केली नाही. यापूर्वी, विराटनेही ट्विट करून मदत केल्याचे जाहीर केले होते, मात्र त्याने देखील दान केलेली रक्कम गुप्त ठेवली. (Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM CARES फंडमध्ये योगदान दिल्याबद्दल मानले रोहित शर्मासमवेत खेळाडूंचे आभार, पाहा काय म्हणाले पंतप्रधान)

कुंबळे यांनी ट्वीट केले की, "कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी आम्हाला ही लढाई एकत्र लढण्याची गरज आहे. मी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडामध्ये काही योगदान दिले आहे. कृपया घरी रहा आणि सुरक्षित रहा." दरम्यान, विराटने किती रक्कम दान केले यावर अद्याप कोणतीही स्पष्टता मिळाली नसली तरी काही रिपोर्ट्सनुसार कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी 3 कोटीची आर्थिक मदत सरकारला दिली असल्याचे समोर येत आहे.

कुंबळेपूर्वी सचिनने 50 लाख, सुरेश रैना 52 लाख तर रोहितने 80 लाखांची देणगी दिली आहे. बीसीसीआयनेही 50 कोटींची देणगी दिली आहे. या व्यतिरिक्त बर्‍याच महासंघांनीही त्यांच्या वतीने मदत केली आहे. केवळ क्रिकेटपटूच नाही तर अन्य खेळाडू देखील या कठीण परिस्थितीत एकत्र येत मदत करत आहे. एशियन गेम्स सुवर्णपदक विजेता भाला फेक एथलीट नीरज चोप्रा याने कोविड-19 विरूद्ध देशाच्या लढाईसाठी केंद्र आणि हरियाणा राज्य मदत निधीसाठी एकूण तीन लाख रुपयांची देणगी दिली. दुसरीकडे, जगभरात कोरोनाची सुमारे 8 लाख प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यात सुमारे 40 हजार लोक मरण पावले आहेत. भारतातही 1,400 रुग्णांच्या आकड्यांच्या जवळ पोहचला आहे.