इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (Photo Credits: Getty Images)

वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies) सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघ (England Cricket Team) 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर'च्या लोगोचा शर्ट घालून विंडीज क्रिकेटच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 8  जुलै पासून इंग्लंड-वेस्ट इंडिजमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मे महिन्यात अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड (George Floyd), या कृष्णवर्णीय इसमाची पोलीस कोठडीत हत्या झाली.अमेरिकेतील या प्रकरणावर विंडीजच्या अनेक खेळाडूंनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. ज्यानंतर कृष्णवर्णीय लोकांना पाठिंबा म्हणून Black Lives Matter अशी मोहिम सुरू करण्यात आली. यापूर्वी वेस्ट इंडीजने खेळाडू आपल्या जर्सीवर “ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर” लोगो वापरतील असे जाहीर केले होतेआणि आता इंग्लंडही ब्लॅक समुदायाला पाठिंबा दर्शवला आहे. वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवणं आमचं कर्तव्य असल्याचं विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरही म्हणाला होता. (एमएस धोनीच्या 'बालिदान बॅज' ग्लोव्हजवर आक्षेप… पण ‘Black Lives Matter’ चालेल; वेस्ट इंडिज खेळाडूंच्या जर्सीवर ICC वर संतापले नेटकरी)

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) घेतलेल्या निर्णयाला पहिल्या कसोटीत कसोटी संघाचे नियमित कर्णधार जो रूट आणि संघाचे कार्यवाहक कर्णधार बेन स्टोक्स यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चिन्हाची रचना अलिशा होसनाह यांनी केली आहे. ईसीबी आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने होसनाशी संपर्क साधला. आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार कॉलरवर लोगो प्रदर्शित करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंड संघ सध्या साऊथॅम्प्टनच्या एजेस बाउलमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात पहिल्या कसोटीची तयारी करीत आहे.

"ब्लॅक लाइव्हज मॅटर" या संदेशास इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे पुर्ण समर्थन आहे. हा एकता आणि प्रगती आणि सामाजिक बदलांचा संदेश बनला आहे. समाजात किंवा आमच्या खेळात वर्णद्वेषासाठी कोणतेही स्थान असू शकत नाही, आणि त्यास सामोरे जाण्यासाठी आपण अजून काही केले पाहिजे," ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले. फ्लॉयडच्या निधनानंतर अनेक खेळाडू उघडपणे वर्णद्वेषाबद्दलच्या अनुभवाबद्दल बोलले. विंडीजचा सलामीवीर फलंदाज क्रिस गेलनेही वर्णद्वेषाचा सामना केल्याचेही सांगितले आणि म्हणाला की, वंशविद्वाचा धोका फक्त फुटबॉलमध्ये अस्तित्त्वात आहे हे एक मिथक आहे. दुसरीकडे, या आठवड्याच्या सुरूवातीस प्रीमियर लीगने आपला निलंबित हंगाम पुन्हा सुरू केला आणि सर्व संघ ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चळवळीशी एकता दर्शवत मजबूत संदेश पाठवत आहेत.