झॅक क्रॉली आणि जोस बटलर (Photo Credit: Twitter/ICC)

इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळला जात आहे. कसोटी मालिकेत इंग्लंड संघ सध्या 1-0 ने पुढे आहे. साऊथॅम्प्टनमधील दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. तिसर्‍या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 332 धावा केल्या. इंग्लंडला या धावसंख्येवर आणण्यात झॅक क्रॉली (Zak Crowley) आणि जोस बटलर (Jos Buttler) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. क्रोली नाबाद 171 आणि बटलर 87 धावा करून खेळत आहेत. खेळाच्या पहिल्या दिवशी दोघांनी पाचव्या विकेटसाठी 205 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. क्रोलीचे आंतरराष्ट्रीय कसोटीमधील हे पहिले शतक होते. क्रोलीच्या शतकी खेळीने इंग्लंडला कठीण स्थितीतून बाहेर काढले. इंग्लंडची धावसंख्या चार बाद 127 असताना क्रोली आणि बटलर यांनी जबाबदारी स्वीकारली. (ENG vs PAK T20 2020: पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेसाठी इंग्लंड टीममध्ये टेस्ट संघातील एकाही खेळाडूचा समावेश नाही; डेविड मालन व क्रिस जॉर्डनचं पुनरागमन)

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्या डावात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने सलामी फलंदाज रोरी बर्न्सला 6 धावांवर झेलबाद केले. टीमचा दुसरा सलामी फलंदाज डोम सिब्लीला यासिर शाहने आपला शिकार बनवला. शाहच्या चेंडूवर तो 22 धावांवर पायचीत झाला. कर्णधार जो रूटला नसीम शाहने 29 धावांवर बाद केले आणि त्याचा झेल मोहम्मद रिझवानने पकडला. ओली पोपने 4 धावांवर यासिर शाहकडून एलबीडब्ल्यू बाद झाला.

दुसरीकडे, आपला आठवा कसोटी सामना खेळताना क्रॉलीचा मागील सर्वोत्तम स्कोअर 76 धावा होता, जो त्याने गेल्या महिन्यात याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध केला होता. चहा ब्रेकनंतर त्याने आपला डाव 97 धावांवरून वाढवला आणि लवकरच मोहम्मद अब्बासच्या चेंडूवर दोन धावा काढून पहिले कसोटी शतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत 19 चौकार ठोकले आहेत. पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बटलरने त्याला उत्तम साथ दिली. या विकेटकीपर फलंदाजाच्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. दरम्यान, अष्टपैलू सॅम कुर्रानच्या जागी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्थान दिले, तर पाकिस्तानने त्यांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.