मंगळवारी आयर्लंड क्रिकेट संघाने (Ireland Cricket Team) साऊथॅम्प्टनच्या रोझ बाऊल स्टेडियमवर अँड्र्यू बालबर्नीच्या (Andrew Balbirnie) नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला (England) उच्च-स्कोरिंग सामन्यात पराभव केला. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात 329 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने सामन्यात एक चेंडू शिल्लक असताना रोमांचक विजय नोंदविला आणि भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) 18 वर्षाचा विक्रमही मोडीत काढला. मंगळवारपर्यंत इंग्लंडविरुद्ध 50-ओव्हरच्या स्वरूपाच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. हा विक्रम भारतीय संघाने 2002 मध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात इंग्लंड-भारतमध्ये झालेल्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम (NatWest Trophy Final) सामन्यात नोंदवला होता. त्यावेळी मोहम्मद कैफ आणि युवराज सिंहच्या जोडीने टीम इंडियाला आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय विजय मिळवला होता. पण, आता पॉल स्टर्लिंग आणि बलबर्नीच्या जोडीने कैफ आणि युवराजच्या कामगिरीला मागे टाकले. (ENG vs IRE 3rd ODI: कर्णधार इयन मॉर्गनचा एमएस धोनीला दे धक्का, तिसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावत नोंदवला अनोखा विक्रम)
आयर्लंडने 7 गडी राखून इंग्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवला. कर्णधार इयन मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 328 धावा केल्या होत्या. इंग्लंडची स्थिती पाहता मालिकेत आयर्लंडची क्लिन स्वीप होणे अपेक्षित होते, पण या दोन खेळाडूंनी जोरदार फलंदाजी केली आणि सामन्याचा निकाल बदलला. आयर्लंडने स्टर्लिंगच्या 142 आणि बलबर्नीच्या 113 धावांनी विजय मिळविला. सामन्याचा निकाल मालिकेच्या दृष्टीकोनातून अपरिहार्य ठरला असला तरी आयर्लंडने इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव नोंदविले. इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आता आयर्लंडने नोंदवला.
इंग्लंडकडून कर्णधार मॉर्गनने 106 धावा केल्या. टॉम बंटनने 58 आणि डेविड विली 51 धावा केल्या. दुसरीकडे, स्टर्लिंग आणि बाल्बर्नी यांनी 214 धावांची भागीदारी केली व टीमला सामन्यात कायम ठेवले. दोघे बाद झाल्यावर हॅरी टेक्टर आणि केविन ओ ब्रायन यांनी धैर्य कायम ठेवले आणि रोमांचक अंतिम ओव्हरमध्ये इंग्लंडविरुद्ध विजयासाठी टीमचे मार्गदर्शन केले.