![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/FjtDCoKaAAI2R7m-380x214.jpg)
महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात दीप्ती शर्माच्या शानदार गोलंदाजीनंतर भारताने ऋचा घोष (नाबाद 44) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (33) यांच्यात चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करून सामना सहज जिंकला. वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कपमधील हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारताने 13 चेंडू बाकी असताना 18.1 षटकात 4 गडी गमावून 119 धावा करून सामना जिंकला.
या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात 4 धावांवर आपली विकेट गमावली. यानंतर स्टॅफनी टेलर (42 धावा) आणि शेमन कॅम्पबेल (30 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला सामन्यात मजबूत स्थितीत आणले. पण दीप्तीने एकाच षटकात दोघांना बाद करुन भारताचे पुनरागमन केले. यादरम्यान दीप्ती टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. भारताकडून रेणुका सिंग (चार षटकात 22 धावा) आणि पूजा वस्त्राकर (चार षटकात २१ धावा) यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2023: प्रशिक्षक राहुल द्रविडचा मोठा खुलासा, या घातक फलंदाजाची थेट प्लेइंग 11 मध्ये होणार एन्ट्री)
वेस्ट इंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या सलामीवीर शफाली वर्मा (28 धावा) आणि स्मृती मानधना (10 धावा) यांनी पहिल्या दोन षटकात 28 धावा जोडून संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. शमेला कॉनेलच्या पहिल्याच षटकात शफालीने तीन चौकार मारले, तर स्मृतीने शेनेल हेन्रीविरुद्ध सलग दोन चौकार मारले. वेगवान गोलंदाजांवर मात केल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने फिरकीपटूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, जो प्रभावी ठरला. मॅथ्यूज आणि करिश्मा रामहरख यांनी पुढील सहा षटकांत नऊ धावांच्या मोबदल्यात तीन महत्त्वपूर्ण बळी घेत धावा रोखल्या. करिश्माने चौथ्या षटकात स्मृतीला यष्टिचित करून वेस्ट इंडिजला पहिले यश मिळवून दिले, तर मॅथ्यूजने पाकिस्तानविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचा (एक धाव) झेल टिपून भारताला दुसरा धक्का दिला. करिश्माने डावाच्या आठव्या षटकात शफालीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
पॉइंट टेबलवर भारताचे स्थान
मात्र, या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार आणि रिचा घोषने टीम इंडियाला परत मिळवून दिले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या जवळ आणले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅप्टन कौरने शेवटी तिची विकेट गमावली, पण तिने आपले काम चोख बजावले आणि शेवटी भारताने आरामात सामना जिंकला. या विजयासह टीम इंडिया 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. नेट रन रेटमध्ये इंग्लंडचा संघ भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहे.