शिखर धवन, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आयपीएल क्वालिफायर 2 (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये फक्त 3 विकेट गमावून 189 धावांपर्यंत मजल मारली. अशा स्थितीत दिल्लीने हैदराबादला विजयासाठी 190 धावंच मोठं आव्हान दिलं आहे. आजच्या 'करो या मरो'च्या सामन्यात सलामी फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) सूर गवसला आणि 78 धावांचा तुफानी डाव खेळला. धवनने आपल्या डावात 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. धवन वगळता मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) 38 आणि कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 21 धावांचे योगदान दिले. शिमरॉन हेटमायर नाबाद 42 धावा करून परतला. दुसरीकडे, हैदराबाद गोलंदाजांनी आपली लय गमावली परिणामी त्यांना फारसे यश मिळाले नाही. सनरायझर्सकडून राशिद खान आणि जेसन होल्डर यांना प्रत्यकी 1 विकेट मिळाली. (ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, रिद्धिमान साहाला हॅमस्ट्रिंगचे निदान, SRH कर्णधार डेविड वॉर्नरने दिली माहिती)

आजच्या महत्वाच्या सामन्यासाठी दिल्लीने संघातून पृथ्वी शॉला बाहेर बसवले असल्याने यंदा टीमकडून नवीन सलामी जोडी मैदानावर उतरली. धवनसह स्टोइनिसने डावाची सुरुवात केली आणि शानदार सुरुवात करून दिली. धवन आणि स्टोइनिसमध्ये पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली. त्यांनतर राशिदने स्टोइनिसला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. स्टोइनिसने 38 धावा केल्या. त्यानंतर धवन आणि कर्णधार श्रेयसने डाव सावरला आणि संघाला शंभरी पार करून दिली. या दरम्यान धवनने 26 चेंडूत चौथे अर्धशतक ठोकले. धवनसोबत चांगली भागीदारी करताना धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयस माघारी परतला. होल्डरने श्रेयसला 21 धावांवर मनीष पांडेकडे कॅच आऊट केलं. अखेर धवन आणि हेटमायरने डेथ ओव्हरमध्ये चौकार-षटकारांची बरसात करत संघाला विशाल लक्ष्य गाठून दिलं.

दरम्यान, आजच्या सामन्यात दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. पृथ्वी शॉच्या जागी प्रवीण दुबे आणि डॅनियल सॅम्सच्या जागी हेटमायरचा समावेश केला आहे. तर, हैदराबादच्या मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.