CSK vs MI, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 41व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पहिले फलंदाजी करत सॅम कुरनच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावरून 114 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दमदार फलंदाजी करत 10 विकेटने राखून आणि 12.2 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले आणि दणदणीत विजय मिळवला. मुंबईसाठी क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) नाबाद 46 आणि ईशान किशनने (Ishan Kishan) नाबाद 68 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नई फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेर कुरनच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर सीएसकेने कशीबशी शंभरी गाठली, पण मुंबईच्या फलंदाजीसमोर चेन्नईचे गोलंदाज ढेर झाले आणि एमआयने मनोरंजक विजय मिळवला. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सच्या एकही गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरला आणि डी कॉक-ईशानच्या जोडीने मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. (CSK vs MI, IPL 2020: रोहित शर्माची सुपर किंग्सविरुद्ध सामन्यातून माघार; 'हिटमॅन' मुंबई इंडियन्सकडून दुसरा, तर आयपीएल करिअरमधील तिसऱ्या सामन्याला मुकला)
ईशानने 29 चेंडूत यंदाच्या आयपीएलमधील दुसरे अर्धशतक ठोकले. डी कॉक आणि किशनमधील पहिल्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीने चार वेळा आयपीएल विजेत्या संघाचा सहज विजय निश्चित केला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची बॅटिंग यंदाही गडगडली. मुंबईच्या भेदक गोलंदाजसमोर सीएसकेला 20 ओव्हरमध्ये 114 धवनपर्यंत मजल मारता आली. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेणाऱ्या मुंबईने दिमाखात सुरुवात केली. बोल्ट आणि बुमराहने पहिल्या 4 विकेट अवघ्या 3 धावांमध्येच काढल्या. यानंतर सीएसके स्वतःला सावरू शकली नाही आणि सॅम कुरनने एकट्याने लढा दिला. कुरनने 47 चेंडूत 52 धावांची खेळी केली. मुंबईसाठी ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि राहुल चाहर यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. नॅथन कुल्टर-नाईलला 1 विकेट घेण्यात यश मिळालं.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील 10 सामन्यातील 7वा विजय ठरला. यासह मुंबईने आयपीएल गुणतालिकेत 14 गुणांसह पुन्हा अव्वल स्थान पटकावले, तर सुपर किंग्सचा 11 सामन्यातील आठवा पराभव ठरला आणि ते 3 विजयासह गुणतालिकेत 6 गुणांसह तळाशी आहेत.