Harbhajan Singh Files Cheating Case: हरभजन सिंहला उद्योगपतीने घातला 4 कोटींचा गंडा, कर्ज स्वरुपात दिलेले पैसे परत न दिल्याने पोलिसात तक्रार दाखल
हरभजन सिंह (Photo Credits: IANS)

भारतीय संघाचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्जचं (Chennai Super Kings) प्रतिनिधीत्व करणारा हरभजन सिंहला (Harbhajan Singh) चेन्नईमधील एका उद्योगपतीने 4 कोटींचा गंडा घातला आहे. गेली अनेक वर्ष या उद्योगपतीने हरभजनकडून घेतलेले पैसे परत दिले नसल्यामुळे अखेरीस हरभजनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, क्रिकेटरने उद्योगपतीला चार कर्ज स्वरूपात दिले होते जे त्याने अद्याप परत न दिल्याने अखेर भारतीय गोलंदाजाने मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) धाव घेतली. हरभजननुसार तो एका मित्राच्या माध्यमातून व्यावसायिकाला भेटला होता. त्यानंतर त्याने 2015 मध्ये जी. महेश (G Mahesh) नावाच्या व्यावसायिकाला वर नमूद केलेली रक्कम कर्ज दिली. मागील अनेक वर्षांमध्ये भज्जी महेशकडे संपर्क साधला, पण नंतर तो पैश्याची परतफेड करण्यासाठी टाळत राहिला. गेल्या महिन्यात महेशने भज्जीला 25 लाखांचा धनादेश दिला होता जो अपुऱ्या निधीमुळे बाऊन्स झाला.

नुकताच चेन्नईला गेल्यानंतर हरभजनने याप्रकरणी औपचारिकपणे पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. वृत्तात दिलेल्या अहवालानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निलंकराई सहाय्यक पोलिस आयुक्त विश्वेश्वरैया यांच्याकडे याचिका पाठविण्यात आली आहे. दरम्यान, वृत्तात पुढे म्हण्टल्यानुसार महेश यांना एसीपीने चौकशीसाठी यापूर्वीच समन्स बजावले आहे, शिवाय त्यांनी सध्या त्यांनी प्रलंबित असलेल्या मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

दुसरीकडे, महेश यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले की, सुरक्षा म्हणून थलांबूर येथे अचल मालमत्ता दिल्यानंतर त्यांनी हरभजनकडून कर्ज घेतले होते. त्यांच्या मते सर्व थकबाकी भज्जीला आधीच देण्यात आली आहे. दरम्यान, या कोविड-19 काळात भज्जीने आयपीएलच्या 13 व्या सत्रातून बाहेर पडायचे ठरवले. भज्जीला या निर्णयानंतर 2 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. एकीकडे जग आर्थिक संकटात सापडले असताना भज्जी कायदेशीर मार्गाने जावून महेशला दिलेले कर्ज परत मिळवून देण्याची आशा बाळगत असेल.