क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) व्यवहारांतून धमकावल्याच्या आरोपाखाली विजय झोल (Vijay Zol) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विजय झोल हा भारताचा अंडर-19 क्रिकेट (Under-19 Cricket) संघाचा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा जावई आहे. उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने विजय झोल याच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन जालना येथील घनसांगी पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, विजय झोल याने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे पुढे आले नाही.
विजय झोल याने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, क्रिप्टोकरन्सीच्या बाजारामूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे झालेल्या तोट्यात विजय याने आपल्याला दोषी धरले असून त्या रागातून त्याने आपल्याला धमकावल्याचा आरोप उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. विजय झोल आणि त्याच्या भावाने धमकावण्यासाठी आपल्या घरी गुंड पाठवले. या गुंडांकरवी त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असाही आरोप खरात दाम्पत्याने तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी विजय झोल, त्याचा भाऊ आणि इतर 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Cryptocurrency Fraud: नागपुरात क्रिप्टोकरन्सीच्या नावावर 2000 लोकांची तब्बल 40 कोटींची फसवणूक; 11 लोकांना अटक )
विजय झोल याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. या प्रकरणात काँग्रेस आमदार कौलास गोरंट्याल यांनी उडी घेतली असून त्यांनी अर्जुन खोतकर आणि विजय झोल कुटुंबीयांवर जोरदार आरोप केले आहेत. कैलास गोरंट्याल यांनी काल (16 जानेवारी) एक पत्रतार परिषद घेतली. यात त्यांनी किरण खरात यांना संपविण्यासाठी खोतकर आणि झोल कुटुंबीयांनी सुपारी दिल्याचा आरोप केला. या प्रकरणात पोलिसांनी खोतकर आणि झोल यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले.
दरम्यान, तक्रारदार विजय खरात यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. खरात दाम्पत्याने क्रिप्टोकरन्सीचे आमिष दाखवत सुमारे 12 लाख रुपयांची फसवणूक केली. खरात पती-पत्नीने आम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून अधिक पैसे मिळवून देण्याचे आमीष दाखवले. त्यातून आम्हाला साडेबारा लाख रुपयांचा गंडा घातला असा आरोप आहे.त्यामुळे तक्रारदार विरोधात तक्रारदार अशा तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.