Cricket in Olympic Games: ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता; आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेत आहे आढावा
ऑलिम्पिक प्रतिनिधी फोटो (Photo Credit: PTI)

क्रिकेटची (Cricket) वाढती लोकप्रियता पाहता गेल्या अनेक वर्षांपासून या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games) समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता बरीच वाढली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) क्रिकेटला 2028 च्या लॉस एंजेलिस, USA येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी इतर नऊ खेळांसह पुनरावलोकन खेळ म्हणून ठेवले आहे. याआधी क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच स्थान मिळाले आहे. 1900 मध्ये पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.

त्यावेळी फक्त ब्रिटन आणि यजमान फ्रान्सने त्यात भाग घेतला. ESPNcricinfo च्या मते, लॉस एंजेलिस गेम्सच्या आयोजन समितीने आणि IOC ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ला त्यांचे सादरीकरण मांडण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर पुनरावलोकन खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय 2023 च्या मुंबईत होणाऱ्या आयओसी अधिवेशनापूर्वी घेतला जाण्याची शक्यता आहे

पुनरावलोकन यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या इतर खेळांमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्सिंग, कराटे, किकबॉक्सिंग, स्क्वॅश आणि मोटरस्पोर्ट यांचा समावेश आहे. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये एकूण 28 खेळांचा समावेश करण्यात येणार असल्याचे IOC ने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते. यासोबतच संभाव्य नवनवीन खेळांची भरही त्यात घातली जाणार आहे.

आयओसीच्या म्हणण्यानुसार, ऑलिम्पिकमध्ये एखाद्या खेळाचा समावेश करायचा असेल तर त्याला काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये खर्च, गुंतागुंत कमी असणे, सुरक्षितता, उत्तम आरोग्यासह सर्वोत्कृष्ट खेळाडूंची उपलब्धता, जागतिक अपील, यजमान देशाचे हित, लैंगिक समानता, युवा प्रासंगिकता, दीर्घकालीन टिकाव इ. चा समावेश आहे. (हेही वाचा: स्म्रीती मंधाना रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये सामील, हिटमॅननंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय खेळाडू)

सध्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला असला तरी त्यात केवळ महिला क्रिकेटपटूच सहभागी होत आहेत. यामध्ये आठ देश टी-20 फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. पण ऑलिम्पिक स्पर्धेत महिला आणि पुरुष या दोन्ही खेळांचा समावेश असणे आवश्यक आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्याप्रकारे क्रिकेट ज्याप्रकारे विशेष आकर्षण बनले आहे, त्याबद्दल आपण खूश असल्याचे आयसीसीचे सीईओ ज्योफ अॅलार्डिस यांनी सांगितले.