COVID-19 Outbreak: आयपीएल रद्द झाल्यास कोणाला होणार किती नुकसान; कोरोना व्हायरसमुळे पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर करार गमावण्याचा धोका
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव जगभरातील मोठ्या क्रीडा स्पर्धांवर दिसत असताना भारतातली सर्वात मोठी टी-20 क्रिकेट लीग, इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 यंदा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 29 मार्चपासून सुरु होणार होती, पण स्पर्धा कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. यंदा आयपीएल (IPL) होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आता आयपीएल होणार नाही हे ऐकण्यासाठी आता आयपीएलचे संघ आणि चाहते जवळजवळ सज्ज झाले आहेत. आयपीएलच्या 13 व्या सत्रावर संकटाचे काळे ढग पसरले आहे आणि जर ही स्पर्धा झाली नाही तर यामुळे कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. स्पर्धेची तारीख पुढे ढकलली असताना आता लीग होईल की नाही आणि सामन्यांची संख्या कमी होईल काहे पाहावे लागेल. पैशांनी परिपूर्ण असलेल्या या टी-20 लीगवर जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता हे लीग आयोजित केले जाईल की नाही, हे येत्या काही दिवसांत निश्चित केले जाईल. (IPL 2020: एमएस धोनीचं टीम इंडियात कमबॅक आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून, टी-20 लीग यावर्षी रद्द झाल्यास काय होईल, घ्या जाणून)

पूर्ण आयपीएल प्रसारित झाल्यास, प्रसारक स्टार इंडिया आणि केंद्रीय प्रायोजकांना एका हंगामासाठी सुमारे 4000 कोटी रुपये मिळतील. स्टार सुमारे 3300 कोटींची कमाई करेल तर व्हिवो आणि अन्य केंद्रीय प्रायोजक 700 ते 750 कोटी कमावतील. शिवाय, खेळाडूंनाही प्रत्येक फ्रँचायझीकडून 85 कोटी रुपये मिळतील. प्रत्येक फ्रेंचायझी प्रति सामन्यात अडीच कोटी ते 4 कोटी गेट मनी मिळवते. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार आयपीएल 2020 साठी सध्या तीन शक्यता समोर येत  आहेत.

1. जर परिस्थिती सुधारली तर एप्रिलच्या मध्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे आयपीएलचे 60 सामने आयोजित केले जाऊ शकतात.

2. परिस्थिती सुधारण्यास उशीर झाल्यास छोट्या आयपीएल चे आयोजन केले जाऊ शकते.

3. आणि अंतिम म्हणजे, जर स्थिती सुधारली नाही तर आयपीएल यंदा रद्द केले जाऊ शकते.

दरम्यान, 15 एप्रिलनंतरही आयपीएलचे आयोजन न केल्यास सुमारे 10 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. कोणत्याही किंमतीत, बीसीसीआयला अशा प्रकारचा धोका निर्माण पत्करायची इच्छा नसेल, त्यामुळे ते स्पर्धेचे आयोजन करू पाहतील. कोरोनाचा धोका पाहता मंडळ रिक्त स्टेडियममध्येही हा सामना आयोजित करण्यास तयार आहे. दुसरीकडे, ही स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंनाही मोठं नुकसान होऊ शकत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि नाथन कल्टर-नील यांना सर्वाधिक पसंती देत फ्रॅन्चायसींनी मोठी रक्कम देऊन खरेदी केले होते. तथापि, कोरोना व्हायरसने प्रवासावर मोठे बंधन आणल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे ज्यामुळे फ्रॅन्चायझीबरोबर त्यांचे करार रद्द होऊ शकतात.