Coronavirus लॉकडाउन काळात सुरेश रैना आणि मुलगी ग्रासियाने घरातच लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद, पाहा व्हिडिओ
सुरेश रैना आणि मुलगी ग्रॅसियाने घरात खेळत आहे गल्ली क्रिकेट (Photo Credit: Video Screengrab)

व्यावसायिक क्रिकेटपासून दूर असणारा सुरेश रैना (Suresh Raina) 13 व्या इंडियन प्रीमिअर लीगमधून (Indian Premier League) मैदानावर पुनरागमन करणार होता, मात्र टूर्नामेंट 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्याने त्याची आणि चाहत्यांची प्रतीक्षा लांबणीवर गेली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा/मालिका पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाउनमध्ये असलेला रैना आपल्या कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत करत आहे. आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्स टीमकडून (Chennai Super Kings) खेळणाऱ्या रैनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला पसंद केला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे ज्यामध्ये रैना घरातच मुलगी ग्रासियासह (Gracia) घरातच गल्ली क्रिकेट खेळत आहे. रैना फलंदाजी आणि बॉलिंग करतोय तर त्याच्या मुलीने अंपायरची भूमिका बजावली. (Video: लॉकडाउनमध्ये एमएस धोनीची मुलगी जिवा अशा प्रकारे करत आहे स्वच्छतेची काळजी, पाहून तुम्हीही म्हणाला Aww)

"घरातील शुद्ध गल्ली क्रिकेट दृश्य!," असे आयपीएल फ्रेंचायझी सीएसकेने व्हिडिओला कॅप्शन दिले. या व्हिडिओमध्ये रैनाने पहिले गोलंदाजी केली. फलंदाजी करणाऱ्या लहान मुलाने रैनाच्या पहिल्या चेंडूवर शॉट मारला, दुसऱ्या चेंडूवर रैनाने त्याचा कॅच पकडला मात्र इतक्यात अंपायर बनलेल्या ग्रासियाने थर्ड अंपायरचा इशारा दिला. नंतर रैना फलंदाजीसाठी आला. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, यापूर्वी लॉकडाउनचे नियम पाळत 'हिटमॅन' रोहित शर्माही मुलगी समायरा सोबत घरातच क्रिकेट खेळताना दिसला. आपल्या व्यस्त जीवनात या क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. अशा स्थितीत या कोविड-19 मुळे लॉकडाउन झाल्याने सध्या हे सर्व खेळाडू आपल्या घरच्यांसोबत उत्तम असा वेळ घालवत आहे. दुसरीकडे, भारतात कोविड-19 लढा असताना रैनाने गरजेच्या वेळी पुढाकार घेतला आणि कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी 52 लाख रुपयांची मदत जाहीर केली. या रोगाने आजवर देशात 110 लोकांचा जीव घेतला तर 4,000 हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.