केदार जाधव (Photo Credits: PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने गुरुवारी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (Mahendra Singh Dhoni) तोंडभरून कौतुक केले. केदार म्हणाला, 'धोनीने आपल्याला संपूर्ण कारकीर्दीत नेहमीच साथ दिली आणि धोनीमुळेच आपल्याला भारताकडून अनेक एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.' केदार जाधवसाठी महेंद्रसिंह धोनी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) यापैकी एकाची निवड करणे म्हणजे, 'आई आणि वडील' यांच्यातील एकाची निवड करण्यासारखे आहे. केदारने चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान चाहत्यांशी संवाद साधला.

केदार यावेळी म्हणाला, ‘प्रत्येक नवोदित क्रिकेटपटूप्रमाणे सचिन तेंडुलकर माझा फार मोठा आदर्श होते. मला खेद आहे की मी त्यांच्याप्रमाणे खेळू शकत नाही. पण आवडत्या क्रिकेटपटूचा विचार केला तर तो धोनी आहे.’ गप्पांमध्ये केदार पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी माही भाईला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला वाटले की तो भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि तो खूप कडक शिस्तीचा असेल. पण त्याला भेटल्यानंतर मला आवडता क्रिकेटपटू म्हणून त्याच्याशिवाय इतर कुणाचाही चेहरा डोळ्यासमोर येत नाही.’ (हेही वाचा: एमएस धोनीचं 'सर्वोत्तम फिनिशर' म्हणून फाफ डु प्लेसिसने केलं कौतुक, IPL मधील 'कॅप्टन कूल चा 'हा' डाव सर्वात आवडता)

35 वर्षीय केदारने 2014 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हापासून त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतकांसह 1389 धावा केल्या आहेत. याबाबत तो म्हणतो, ‘मी कदाचित आठ किंवा दहाच एकदिवसीय सामने खेळले असतील, पण माही भाईने मला पूर्ण साथ दिली. जेव्हा जेव्हा मी त्याला भेटायचो तेव्हा तेव्हा माझा आत्मविश्वास वाढायचा आणि एक कर्णधार म्हणून त्याची खूप मदत नाही.’ जाधवची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली नव्हती. कोरोना विषाणूमुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली.

केदार सलमानचा खूप मोठा चाहता आहे, जेव्हा त्याला धोनी आणि या स्टार अभिनेत्यापैकी एकाची निवडा करण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘एमएस धोनीमुळे मला खूप सामने खेळायला मिळाले आणि त्यांच्यामुळेच मी सलमान खानला भेटलो. म्हणूनच मी या दोघांपैकी एका कोणाला निवडू शकत नाही. ही गोष्ट म्हणजे आपल्या आई-वडिलांपैकी एकाची निवड करण्यासारखे आहे.’