Chetan Sharma, Abey Kuruvilla and Debashish Mohanty. (Photo Credits: Twitter@Twitter)

भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड एका वर्षासाठी करण्यात आली आहे. चेतन शर्मा लवकरच विद्यमान अध्यक्ष सुनील जोशी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. चेतन शर्मा यांच्यासह माजी गोलंदाज अभय कुरुविल्ला (Abey Kuruvilla) आणि देबाशीष मोहंती (Debasis Mohanty) यांची देखील पाच सदस्यीय समितीत निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आभासी परिषदेदरम्यान अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.

निवड समितीच्या तीन जागांसाठी 13 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये अजित आगरकर, शिवसुंदर दास, नयन मोंगिया आणि मणिंदर सिंग यांच्यासारख्या प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता. या सर्वांच्या मुलाखतीनंतर चेतन शर्मा, अभय कुरुविल्ला आणि देबाशीष मोहंती यांची निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांनी 88 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच एकदिवसीय सामन्यात भारताकडून प्रथम हॅटट्रिक पटकवणाऱ्या खेळाडूचा मान त्यांना मिळाला आहे. हे देखील वाचा- Boxing Day Test 2020: सुपर शनिवार! क्रिकेट चाहत्यांना एकाच दिवशी मिळणार तीन बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यांची मेजवानी

बीसीसीआयचे ट्विट-

"समितीने ज्येष्ठतेच्या आधारे पुरुष सीनियर क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांच्या नावाची शिफारस केली. क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) एक वर्षाच्या कालावधीनंतर उमेदवारांचा आढावा घेईल आणि बीसीसीआयकडे याची शिफारस करेल", असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.