ICC Champions Trophy 2025 trophy, ICC and PCB logos (Photo credit: X @therealpcb, @icc)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) संदर्भात वातावरण पूर्णपणे तापले आहे. भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास स्पष्ट नकार दिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्याही किंमतीत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयने आयसीसीला कळवले होते. तेव्हापासून पाकिस्तान आयसीसीकडे यामागील कारणाची मागणी करत आहे. बीसीसीआयने आधीच सुरक्षेचे कारण सांगितले आहे. अशात पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी दौरा आयोजित केला होता. पीओकेच्या तीन शहरांमध्ये ही ट्रॉफी जाण्याची चर्चा होती, परंतु आता आयसीसीने (ICC) यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. आयसीसीने म्हटले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी जाणार नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी 14 नोव्हेंबरला इस्लामाबादला पोहोचणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून 14 नोव्हेंबरच्या संध्याकाळी करण्यात आली. यानंतर 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ट्रॉफी पाकिस्तानमधील विविध शहरांत जाईल, अशी माहिती पीसीबीने सोशल मीडियावर दिली होती. त्यांनी सांगितले की ट्रॉफी स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद सारख्या ठिकाणी जाईल. या चार ठिकाणांपैकी फक्त मुरी हा पाकिस्तानचा भाग आहे. याशिवाय इतर तीन ठिकाणे स्कर्दू, हुंजा आणि मुझफ्फराबाद पीओकोमध्ये (PoK) मध्ये येतात.

पाकिस्तानने ट्रॉफीच्या दौऱ्याची घोषणा करताच बीसीसीआयने आक्षेप घेतला आणि आयसीसीने यावर तात्काळ कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या कृतीमुळे भारतासह टीम इंडियाचे चाहते आणखी संतप्त झाले होते, परंतु बीसीसीआयने आयसीसीला वेळीच याची माहिती दिली आणि पाकिस्तानला तसे करण्यापासून रोखले. ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमधील तीन शहरांमध्ये म्हणजेच पीओकेमध्ये नेण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा: India To Host Champions Trophy 2025: पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला नकार दिल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताकडे येणार - अहवाल)

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने आणि प्रत्युत्तरात हायब्रीड मॉडेलसाठी पाकिस्तान तयार नसल्यामुळे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, आयसीसीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे, जेव्हा कोणत्याही अधिकृत स्पर्धेच्या वेळापत्रकाशिवाय ट्रॉफी दौरा पार पडत असेल. सहसा स्पर्धेचे वेळापत्रक किमान 100 दिवस अगोदर जाहीर केले जाते, त्यानंतरच ट्रॉफीचा दौरा सुरू होतो. मात्र यावेळी काही वेगळेच पाहायला मिळत आहे.