IND vs UAE (Photo Credit- X)

IND vs UAE, Asia Cup 2025: आशिया कप 2025 मध्ये आजचा दुसरा सामना ग्रुप-ए मधील यजमान भारत आणि यूएई (IND vs UAE) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. भारतीय संघ या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे, तर यूएईची नजर मोठा उलटफेर करण्यावर असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरत असून, कर्णधार म्हणून त्याच्यासाठीही ही स्पर्धा मोठी ठरू शकते. त्यामुळे, यूएईविरुद्ध भारतीय संघाचा टी-20 रेकॉर्ड कसा राहिला आहे, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजपर्यंत फक्त एकदाच झाली दोन्ही संघांची गाठ

भारत आणि यूएई यांच्यातील टी-20 क्रिकेटमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, हे दोन्ही संघ आतापर्यंत फक्त एकदाच आमने-सामने आले आहेत. हा एकमेव सामना तब्बल 9 वर्षांपूर्वी 2016 च्या आशिया कपमध्ये खेळला गेला होता. मीरपूरच्या मैदानावर झालेल्या त्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी 9 गडी राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यात, यूएईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 81 धावा केल्या होत्या, ज्या भारतीय संघाने केवळ 1 गडी गमावून 10.1 षटकांत सहज पूर्ण केल्या.

हे देखील वाचा:  IND vs UAE Weather Report: टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात पावसाची शक्यता? वाचा दुबईतील हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज

2016 च्या संघातून हे दोन खेळाडू आजही आहेत

2016 मध्ये जेव्हा भारतीय संघ यूएईविरुद्ध टी-20 सामना खेळला होता, तेव्हाच्या अनेक खेळाडूंनी आता निवृत्ती घेतली आहे. मात्र, त्या संघातून केवळ दोन खेळाडू आजही टीम इंडियाच्या स्क्वॉडचा भाग आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. विशेष म्हणजे, 2016 च्या त्या सामन्यात बुमराह आणि हार्दिक दोघांनीही प्रत्येकी एक बळी घेतला होता.