
IND vs UAE, Asia Cup 2025 Weather Report: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आजपासून आपल्या आशिया कप 2025 च्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना यूएईविरुद्ध भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ स्पर्धेची दणदणीत सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दरम्यान, चाहत्यांच्या मनात संघाची प्लेइंग इलेव्हन आणि दुबईतील हवामानाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
दुबईचे हवामान कसे असेल?
टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात पावसाची शक्यता आहे का, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. मात्र, तसे होण्याची शक्यता नाही. 'अक्यूवेदर'च्या रिपोर्टनुसार, आज दुबईतील हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल आणि सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नाही. तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, आर्द्रता 60 ते 70 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यामुळे खेळाडूंना उष्णतेमुळे थोडा त्रास जाणवू शकतो.
कशी असेल खेळपट्टी?
दुसरीकडे, दुबईच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, येथे फिरकीपटूंना चांगली मदत मिळते. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक फिरकीपटूंना संधी देण्यावर लक्ष केंद्रित करतील. या मैदानावर आतापर्यंत 110 टी-20 सामने खेळले गेले असून, त्यापैकी 51 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या मैदानावर सरासरी धावसंख्या 140 ते 145- च्या दरम्यान राहिली आहे.
खेळाडूंची होणार मोठी ‘फिटनेस’ टेस्ट
भारत आणि यूएई यांच्यातील सामन्यात प्रचंड उष्णता असणार आहे, ज्यामुळे खेळाडूंची मोठी फिटनेस टेस्ट होणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवसह अनेक भारतीय खेळाडू दुखापतीतून सावरले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.