Vijay Hazare Trophy 2021: अर्जुन तेंडुलकरला मोठा झटका; मुंबईच्या संघात मिळाले नाही स्थान
अर्जुन तेंडुलकर (Photo Credits: Instagram/Arjun Tendulkar)

क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडूलकराला (Arjun Tendulkar) मोठा झटका लागला आहे. नुकतीच विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy 2021) मुंबईच्या (MCA) संघाची घोषणा झाली आहेत. मात्र, या संघात अर्जुन तेंडुलकरला स्थान मिळाले नाही. महत्वाचे म्हणजे, येत्या 18 फेब्रुवारीला भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अर्जुन तेंडूलकर आयपीएलमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. त्याने आयपीएल 2021 च्या लिलावात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याआधीच त्याला मोठा धक्का लागला आहे.

विजय हजारे ट्रॉफीला येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघातील मध्यक्रमचा फलंदाज श्रेयस अय्यरकडे मुंबईच्या संघाचे कर्णधारपद असेल तर, पृथ्वी शॉ याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे. नुकतीच पार पडलेल्या मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, त्याला काही खास कामगिरी बजावता आली नाही. हरियाणा विरुद्ध त्याने पदार्पण केले होते. मात्र, त्याला केवळ एकच विकेट मिळवता आली. हे देखील वाचा- जेव्हा विराट मराठीत बोलतो... पृथ्वी शॉ ने सांगितला भारतीय कर्णधार चा मजेदार किस्सा ( Watch Video )

भारताची स्थानिक क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 20 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. तसेच सूरत, इंदूर, बेंगलुरू, जयपूर, कोलकाता आणि चेन्नई येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मुंबईच्या 22 सदस्यीय संघात यशस्वि जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि तुषार देशपांडे यांचाही समावेश आहे. मुंबईचा संघ दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पुडुचेरीसमवेत एलिट ग्रुप डीमध्ये असून या गटातील सामने जयपूरमध्ये होणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले आहे की सहा गटात विभागल्या गेलेल्या या स्पर्धेत 38 संघ सहभागी होतील. प्रत्येक संघाला पाच एलीट ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. सहा संघाचा एक ग्रुप असणार आहे. एलिट गटातील गटांना ए, बी, सी, डी आणि ई वर्गात विभागले गेले आहे.