प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग- विराट कोहलीला BCCI ची ताकीद
विराट कोहली (Photo: Getty Images)

प्रसारमाध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधताना जरा नम्रतेने वाग, अशी तंबी BCCIच्या प्रशासकीय समितीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला दिली आहे. विराटने चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर BCCI ने त्यावर नाराजी व्यक्त केली. 21 नोव्हेंबरपासून भारतीय संघ टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यापूर्वी विराटला ही ताकीद देण्यात आली आहे.

"भारतीय फलंदाजीत फारसा दम नाही, त्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात,"असं एका चाहत्याने म्हटलं होतं. त्यावर कोहलीला राग अनावर झाला आणि विराट म्हणाला, "परदेशी खेळाडू आवडत असतील तर देश सोडून जा."

विराटच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावरही त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले. BCCIच्या प्रशासकीय समितीनेही विराटला तंबी दिली. समितीतील सदस्यांशी विराटने फोनवरुन चर्चा केली. त्यावेळेस "आक्रमकपणा खेळात असू दे, प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांशी बोलताना नको. त्यांच्याशी विनम्रतेनेच वाग,"असा सल्ला समितीने दिला आहे. यावर विराटने काय उत्तर दिले, हे समजू शकलेलं नाही. मात्र विराटने समितीचा हा सल्ला ऐकला असावा. कारण याचा प्रत्यय विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आला.