Rohit Sharma (Photo Credit - X)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉ. शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल एक वादग्रस्त पोस्ट पोस्ट केली आहे. काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी रोहितला जाड म्हटले असून, त्याला भारतीय इतिहासातील सर्वात अप्रभावी कर्णधार देखील म्हटले होते. या पोस्टनंतर एकच गोंधळ उडाला आणि आता शमावर सर्वत्र टीका होत आहे. वाद वाढत असल्याचे पाहून, काँग्रेस पक्षाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी मोहम्मद यांना सोशल मीडियावरून त्यांची पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश दिले. परंतु अजूनही हा मुद्दा खूपच तापला आहे. अशात आता बीसीसीआयने (BCCI) यावर प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या मुद्द्यावर मोठे विधान केले आहे.

भारतीय संघ एक मोठा सामना खेळणार असताना शमा मोहम्मदने ही पोस्ट केली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. देवजीत सैकिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले की, 'संघ एका महत्त्वाच्या स्पर्धेच्या मध्यभागी असताना, एका जबाबदार व्यक्तीने अशा क्षुल्लक टिप्पण्या करणे हे खूप दुर्दैवी आहे. याचा संघावर आणि खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, कृपया अशा टिप्पण्या करू नका.' (हेही वाचा: Shama Mohamed on Rohit Sharma: 'रोहित शर्मा खूप जाडा'; काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांचे संतापजनक विधान; सोशल मीडियावर टीका होताच दिले स्पष्टीकरण)

BCCI on Rohit Sharma Fat-Shaming Row:

काँग्रेस प्रवक्त्या आणि व्यवसायाने दंतवैद्य डॉ. शमा मोहम्मद यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर रोहितला टॅग करून एक पोस्ट पोस्ट केली होती आणि लिहिले होते की, 'खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे. त्याला वजन कमी करायचे आहे. आणि निश्चितच तो भारताचा सर्वात अप्रभावशाली कर्णधार आहे.’ आता त्याने त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. शमा मोहम्मद यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. शमा मोहम्मद म्हटले की, ‘मी कोणाचाही अपमान करण्यासाठी ट्विट केले नाही.’

त्या म्हणाल्या, ‘एक खेळाडू म्हणून रोहितचे वजन जास्त आहे. मी कोणतेही बॉडी शेमिंग केलेले नाही. तसेच इतर कर्णधारांशी तुलना केल्यास, तो असा कर्णधार आहे ज्याचा फारसा प्रभाव नाही.’ दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने रविवारी न्यूझीलंडला 44 धावांनी हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाची हॅटट्रिक साधली. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर शमाने रोहित शर्माबद्दल पोस्ट केली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे जिथे त्यांचा सामना मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.