BCCI ने भारत सरकारला केले मालामाल, एका वर्षात भरला इतक्या कोटींचा कर; अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेटला प्रोत्साहन देणारी बीसीसीआय (BCCI) भारत सरकारलाही (Indian Government) श्रीमंत करत आहे. बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भरपूर पैसे कमावले आणि 1159 कोटी रुपयांचा विक्रमी कर (Tax) भरला. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chowdhary) यांनी ही माहिती दिली असून, हे प्रमाण वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी अधिक आहे. मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बीसीसीआयने भरलेला आयकर आणि आयकर रिटर्नच्या आधारे बीसीसीआयचे गेल्या 5 वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचा तपशीलही दिला आहे.

मंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या सुरुवातीला कोरोनामुळे क्रिकेटची मैदाने ओसाड पडली होती. खेळाडू बायोबबलमध्ये होते. त्यामुळे क्रिकेट संघटनांचा खर्च वाढला. मात्र, आता बीसीसीआयला कोणतीही अडचण नाही. (हे देखील वाचा: Shubman Gill Form: वेस्ट इंडिज दौऱ्यावर शुभमन गिलचा फ्लॉप शो सुरूच, वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं)

बीसीसीआयचा 2017 ते 2021 या कालावधीतील कमाई आणि खर्चाचा तपशील

  • 2017-18 मध्ये 2916.67 कोटींची कमाई. 2105.50 कोटी रुपये खर्च झाले.
  • 2018-19 मध्ये 7181.61 कोटी रुपये कमावले होते तर 4652.35 कोटी रुपये खर्च केले होते.
  • 2019-20 मध्ये 4972.43 कोटी रुपये कमावले, 2268.76 कोटी रुपये खर्च केले.
  • 2020-21 मध्ये 4,735 कोटी रुपयांची कमाई. 3,080 कोटी रुपये खर्च झाले.
  • 2021-22 मध्ये 7,606 कोटी रुपयांचा महसूल मिळवला, तर खर्च 3,064 कोटी रुपये होता.

बीसीसीआयने कधी आणि किती कर भरला

  • 2017-18 मध्ये 596.63 कोटी
  • 2018-19 मध्ये 815.08 कोटी रुपये
  • 2019-20- रु 882.29 कोटी
  • 2020-21- रु 844.92 कोटी
  • 2021-22 मध्ये 1,159 कोटी रुपये