AUS vs NZ, T20 World Cup 2021 Final: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील कोण बनणार टी-20 विजेता
सौरव गांगुली (Photo Credits: PTI)

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (ICC Men's T20 World Cup) स्पर्धेचा अंतिम सामना आज, 14 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात होणार आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या जेतेपदाच्या सामन्याबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. न्यूझीलंड संघ फायनल जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचे गांगुलीचे मत आहे. याची दोन कारणे देत त्याने किवी संघाला पाठिंबा दिला. अलीकडच्या काळात न्यूझीलंडची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. एकदिवसीय विश्वचषक 2019 फायनल फेरीत पोहोचल्यानंतर त्यांनी यंदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली आहे. (AUS vs NZ Final, T20 WC 2021 Live Streaming: न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया हाय व्होल्टेज सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?)

दोन्ही संघ आपापले पहिले विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात नव्हते परंतु दोन्ही संघांनी त्यांच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव केला तर न्यूझीलंडने रोमहर्षक सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. गांगुली शारजाह इंटरनॅशनल बुक फेअरमध्ये संभाषणादरम्यान म्हणाले, “मला वाटते की जागतिक खेळात न्यूझीलंडसाठी ही वेळ आली आहे. ऑस्ट्रेलिया महान देश आहे पण त्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या बाबतीत जरी उत्कृष्ट असला तरी न्यूझीलंडमध्ये टीव्हीवर जे दिसते त्यापेक्षा जास्त धैर्य आणि क्षमता आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते. न्यूझीलंड देश छोटा आहे पण त्यांच्याकडे खूप प्रतिभा आहे. मला वाटतं आता न्यूझीलंडची वेळ आली आहे.”

गांगुलीने टी-20 विश्वचषकमध्ये भारताच्या अयशस्वी मोहिमेवरही भाष्य केले. बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले, “विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ काही खराब सामन्यांमुळे बाहेर पडला, पण आगामी मालिकेत भारत जोरदार पुनरागमन करेल. अपेक्षा निःसंशयपणे उंचावल्या होत्या पण निराशा होऊनही लोकांनी निकाल स्वीकारला याचा आनंद आहे. ते नाराज होते, पण त्यांनी जास्त प्रतिक्रिया दिली नाही.” गांगुली म्हणाले, “शेवटी बुमराह, शमी, रोहित आणि कोहली हे सगळे माणूसच आहेत. फक्त दोन खराब सामने होते. ते खराब क्रिकेटचे 40 ओव्हर्स होते. ते पुनरागमन करतील आणि वर्षभरात आम्ही हीच मुले ट्रॉफी जिंकताना पाहू.” 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे.