जॅक लीचने चाहत्याच्या टक्कलवर दिला ऑटोग्राफ (Photo Credit: Twitter)

AUS vs ENG, Ashes 4th Test 2022: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात आजपासून चौथ्या अ‍ॅशेस (Ashes) सामन्याला सुरुवात झाली. पावसाने बाधित सामन्यात कांगारू संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ नियमित पावसामुळे बाधित झाला आणि यजमान संघाने दिवसाखेर 126/3 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सकारात्मक सुरुवात करून दिली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. थ्री लायन्ससाठी वेगवान गोलंदाजांनी बहुतेक षटके टाकली आणि फिरकी गोलंदाज जॅक लीचला (Jack Leech) फक्त 2 षटकांसाठी चेंडू देण्यात आला. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. (AUS vs ENG, Ashes 4th Test: इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोर 126/3, पावसाने थांबवला दिवसाचा खेळ)

पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान, लीचने चाहत्यांच्या टक्कलवर ऑटोग्राफ देत सोशल मीडियावर यूजर्सचे लक्ष वेधले. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याच्या या कृतीवर चाहत्यांनाही हसू अनावर झाले. इंग्लंडच्या बार्मी आर्मीने लीचचा हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत इंग्लंड फिरकीपटू जॅक लीच सामन्याच्या पहिल्या दिवशी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला ऑटोग्राफ (सही) देताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्या चाहत्याने पूर्ण टक्कल केले असल्याने लीचने त्याच्या टक्कलवर ऑटोग्राफ दिला आहे. हे पाहून, त्या चाहत्यासह कसोटी सामना पाहायला आलेले इतर क्रिकेटही भलतेच खुश झालेले दिसले. दरम्यान, पावसाने दुसऱ्या दिवशी साथ दिल्यास विकेटच्या शोधात असलेल्या ब्रिटिश संघासाठी लीच आपली भूमिका बजावण्यासाठी उत्सुक असेल.

सामन्याबद्दल बोलायचे चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाला पावसाचा जोरदार फटका बसला आणि जवळपास 43 षटकांचा खेळ वाहून गेला. याशिवाय पॅट कमिन्सच्या नेतृत्वात कांगारू संघाने पहिले तीन कसोटी सामने जिंकून अ‍ॅशेस आधीच राखली आहे. त्यांनी पहिली कसोटी 9 गडी राखून जिंकली आणि दुसऱ्या कसोटीत 275 धावांनी मोठा विजय नोंदवला.  विशेष म्हणजे अ‍ॅडिलेडमध्ये स्टिव्ह स्मिथने यजमान संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 14 धावांनी पराभव केला. याशिवाय मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 14 ते 18 जानेवारी दरम्यान होबार्ट येथे खेळवला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे.