वेगवान गोलंदाज झे रिचर्डसनच्या (Jhye Richardson) 5 विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा (England) 275 धावांनी धुव्वा उडवला. उल्लेखनीय म्हणजे ऑस्ट्रेलिया संघ पिंक-बॉल कसोटी (Pink Ball Test) सामन्यात सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत खेळलेले सर्व 9 सामने जिंकले आहेत. सोमवारी, अॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी (Day/Night Test) सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी जो रूटचा ब्रिटिश संघ 468 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात केवळ 192 धावाच करू शकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. मालिकेतील तिसरा कसोटी सामना आता 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. (Ashes 2021-22: इंग्लंडविरुद्ध उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, कर्णधार पॅट कमिन्ससह ‘या’ तडाखेबाज खेळाडूचे झाले कमबॅक)
स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने अॅडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात 9 बाद 473 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या डावात 236 धावांवर गुंडाळले. यजमानांनी आपला दुसरा डाव 9 बाद 230 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 48 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड संघ केवळ 192 धावाच करू शकला आणि त्यांना 275 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मार्नस लाबूशेनला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. लॅबुशेनने पहिल्या डावात 103 आणि दुसऱ्या डावात 51 धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ख्रिस वोक्सने 97 चेंडूंत सात चौकारांसह 44 धावा केल्या. त्याच्याशिवाय रॉरी बर्न्सने 34, जोस बटलरने 26 आणि कर्णधार जो रूटने 24 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून झे रिचर्डसनने 5, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने प्रत्येकी 2 तर माइकल नासरने एक विकेट घेतली.
अॅडिलेड गुलाबी-बॉल कसोटीच्या 5 व्या दिवशी जोस बटलरने 207 चेंडूत 26 धावा केल्या आणि इंग्लंडसाठी सामना अनिर्णित करण्यासाठी झटला पण झे रिचर्डसनने पहिले पाच विकेट घेत यजमानांना संस्मरणीय विजय मिळवून दिला. शेवटच्या सत्रात बटलर हिट-विकेटवर आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला. बटलरला हे देखील कळले नाही की त्याने स्टंपवर पाऊल ठेवले पण ऑस्ट्रेलियाने आनंद साजरा करण्यास सुरुवात केली, विकेटकीपर-फलंदाज बाद झाल्यानंतर कांगारू संघासाठी विजय ही केवळ औपचारिकता राहिली. दरम्यान, इंग्लंडवर आता सलग दोन सामने गमावल्यावर मालिका पराभवाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात ब्रिटिश संघ मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.