स्टुअर्ट ब्रॉड आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: @englandcricket/Instagram and @cricketcomau/Twitter)

इंग्लंड (England) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) संघात हेडिंग्ले (Headingley), लीड्स (Leeds) येथे तिसऱ्या अ‍ॅशेस (Ashes) टेस्ट सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, आज 23 ऑगस्ट रोजी सामन्यात आज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 67 धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून जो डेन्ली (Joe Denly) याने सर्वाधिक 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवुड याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स याने 3 आणि जेम्स पॅटिन्सन 2 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडची गोची केली. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर (David Warner) याने संघाचा डाव सावरला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाई गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि दुसऱ्या दिवशी इंग्लंडला फक्त 67 धावांवर रोखले. यासह ऑस्ट्रेलियाने 112 धावांची मोठी आघाडी मिळवली. (Ashes 2019: पहिले बाउन्सरने केले जखमी; आता जोफ्रा आर्चर याने स्टीव्ह स्मिथ याच्या फलंदाजीचे अनुसरण करत उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्याला इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने पायचीत केले. वॉर्नरला शून्यावर बाद करत ब्रॉडने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली. आजवर वॉर्नरची टेस्टमध्ये ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद होण्याची ही 9 वी वेळ होती. त्यामुळे ब्रॉडने टेस्टमध्ये वॉर्नरला सर्वाधिकवेळा बाद करण्याच्या भारताच्या आर अश्विन (R Ashwin) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसन यांनी देखील वॉर्नरला टेस्टमध्ये प्रत्येकी 9 वेळा बाद केले आहे.

तत्पूर्वी या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 179 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून वॉर्नर आणि मार्नस लॅब्युशाने यांनी अर्धशतकी खेळी केली होती. लॅब्युशाने 74 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, इंग्लंडसती पहिल्या डावांत जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या होत्या.