निवृत्तीतून परतलेल्या अंबाती रायुडू याने उघडला स्वतःच्या टीमविरूद्ध मोर्चा, हैदराबाद क्रिकेटवर केला भ्रष्टाचाराचा आरोप
अंबाती रायडू (Photo Credit: ICC/Twitter)

भारतीय संघाचा मध्यमगती फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. रायुडूने विश्वचषकमध्ये निवड न झाल्याने निवृत्ती घेतली होती, पण आपला निर्णय बदलत त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. रणजी ट्रॉफीच्या पुढील हंगामात खेळण्यास आपण अनुपलब्ध असल्याचे त्याने उघड केले आहे, परंतु त्याच्या एका ट्विटमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. रायुडूने ट्विटद्वारे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर (Hyderabad Cricket Association) भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.रायडूने तेलंगणाचे मंत्री के.टी.रामाराव यांना आंध्र प्रदेश क्रिकेट (Andhra Pradesh Cricket) असोसिएशनमधील भ्रष्टाचार रोखण्याचे आवाहन केले आहे. हैदराबादच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधून काही महिन्यांची विश्रांती मागितल्याच्या घोषणेनंतर दुसर्‍या दिवशी रायुडूने हे आरोप केले आहेत.

आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख भारतीय माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आहे. अंबातीने संघाला दोष देण्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे तो अझरवरही निशाणा साधत आहे. रायडूने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "हॅलो सर, मी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आवाहन करतो. जोपर्यंत हैदराबाद क्रिकेट संघातील पैसा आणि भ्रष्टाचारी लोकं हस्तक्षेप करत राहतील तोपर्यंत आपण एक महान संघ कसा बनू शकतो?" भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वचषक संघात निवड न झाल्याने रायुडूने निवृत्ती जाहीर केली, होती पण नंतर ऑगस्टमध्ये त्याने निवृत्तीतून पुनरागमन केले होते.

विजय शंकर याची आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल नाराज रायुडूने मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली होती. या ट्विटमध्ये 3 डी ग्लासेससह वर्ल्ड कप पाहण्याची बाब लिहिलेली होती. निवृत्तीनंतर पुनरागमन करत रायुडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 7 डावांमध्ये 233 धावा केल्या. हैदराबादकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रायुडू दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने भारताकडून 55 वनडे सामने खेळले आहेत.