IND vs ENG 3rd D/N Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाने एकतर्फी विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. हा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपुष्टात आला ज्यानंतर खेळपट्टीवर पुन्हा एकदा टीका सुरु झाली. क्रिकेट जगातील अनेकांनी अहमदाबादच्या (Ahmedabad) खेळपट्टीवर टीका करण्यास सुरवात केली. सामना नंतरच्या मुलाखती दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूटदेखील खेळपट्टीबद्दल आनंदी दिसला नाही. इंग्लंडचे माजी फलंदाज केविन पीटरसनने (Kevin Pietersen) देखील हिंदीमध्ये ट्विट करत टीकास्त्र सोडले तर माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी गमतीशीर मिम शेअर करत त्यांना उत्तर दिले. सामन्यानंतर केविन पीटरसनने लिहिले की, "अशा सामन्यासाठी अशी विकेट ठीक आहे जिथे फलंदाजाच्या कौशल्याची आणि पद्धतीची टेस्ट घेतली जाते. पण मला हा विकेट पाहण्याची इच्छा नाही आणि मला वाटते की सर्व खेळाडूंनाही हे नको आहे. खूप चांगले भारत." प्रत्युत्तरात, जाफरने मिम शेअर केला आणि पीटरसनला कठोर उत्तर दिले. (IND vs ENG 3rd D/N Test: ‘मोटेराची खेळपट्टी आव्हानात्मक, खेळण्यासाठी योग्य की नाही ICC ने घ्यावा निर्णय’, पराभवानंतर जो रूटची प्रतिक्रिया)
ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या जाफरने पीटरसनच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले. त्यांनी वेब सीरिजमधील एक फोटो ट्विट केले ज्यात ‘आप कितना नाटक करो’ म्हणजे ज्याने ‘तू इतके नाट्यमय आहेस’ असे उद्धृत केले होते. अहमदाबाद येथील भारत आणि इंग्लंड संघातील काही दिवस चर्चेचा विषय नक्कीच ठरेल कारण कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात गुंडाळला गेला. पुढील कसोटी सामना 4 मार्च रोजी याच मैदानावर सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.
#INDvsENG https://t.co/4iBqFGSvXd pic.twitter.com/RzqoK4h119
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 25, 2021
दरम्यान, दोन्ही संघासाठी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना निर्णायक होता ज्यात अखेर टीम इंडियाने बाजी मारली. या विजयासह अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या भारतीय संघाच्या आशा कायम आहेत तर इंग्लंड फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. न्यूझीलंडने यापूर्वीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. शिवाय, भारतासह फायनलच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान देखील कायम आहे. इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना ड्रॉ झाल्यास ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे दरवाजे उघडतील तर भारताचे स्वप्न भंग होईल.