Virat Kohli and Rohit Sharma: भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, केंद्रीय करारात या दोन्ही खेळाडूंचा दर्जा कमी होईल की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबद्दल माहिती दिली आहे. रोहित आणि विराट हे भारतीय संघातील बऱ्याच काळापासून महत्त्वाचे खेळाडू आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या केंद्रीय करारात त्यांना ए+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

रोहित-कोहलीच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

इंग्लंड दौऱ्याच्या एका आठवड्यातच रोहित आणि विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या दोन्ही खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना दिसतील. फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळल्यानंतर त्याचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ग्रेड कमी केला जाणार नाही. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

सैकिया यांनी भूमिका स्पष्ट केली

सैकिया म्हणाले की, रोहित आणि विराट यांनी टी-20 नंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर केली असली तरी ते अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत. त्यामुळे दोघांनाही केंद्रीय कराराच्या ग्रेड ए प्लसची सुविधा मिळत राहील.

गेल्या महिन्यात, बीसीसीआयने 2024-2025 या वर्षासाठी खेळाडूंच्या वार्षिक करारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 34 खेळाडू आहेत. रोहित आणि कोहलीसह चार खेळाडूंना A+ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले. बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या ए+ श्रेणीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना कायम ठेवण्यात आले आहे.

ग्रेड ए+ मध्ये समाविष्ट खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी मिळतात

बीसीसीआय ए+ ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी रुपये, ए ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 5 कोटी रुपये, बी ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि सी ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 1 कोटी रुपये देते. बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत फक्त अशा खेळाडूंचा समावेश आहे ज्यांनी एका वर्षात किमान तीन कसोटी, आठ एकदिवसीय सामने किंवा 10 टी-20 सामने खेळले आहेत.