
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) साठी तामिळनाडू (Tamil Nadu) संघ जाहीर करण्यात आला आहे. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत तमिळनाडूचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण, टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज अभिनव मुकुंद (Abhinav Mukund) याला संघात स्थान मिळाले नाही. तामिळनाडू संघाचा बी गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात तामिळनाडूसह उत्तर प्रदेश, विदर्भ, राजस्थान आणि यजमान केरळ संघांचा समावेश आहे. ग्रुप ‘बी’ मधील सामने 8 ते 17 नोव्हेंबर दरम्यान तिरुअनंतपुरममध्ये खेळले जातील. गुणतालिकेतील पहिले दोन संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. दरम्यान, संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी अष्टपैलू विजय शंकर याच्यावर सोपविण्यात आली आहे.
तामिळनाडू संघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूंचादेखील समावेश आहे. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, मुरली विजय आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना स्थान मिळाले आहेत. भारत-बांगलादेश टी-20 मालिका संपल्यानंतर ते संघात सामील होतील. विजय हजारे ट्रॉफी वनडे क्रिकेटच्या अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाला नुकताच कर्नाटककडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूने गट सीमध्ये आपले सर्व नऊ सामने जिंकले होते. कार्तिक, बाबा अपराजित, अभिनव मुकुंद, एम शाहरुख खान आणि गोलंदाज टी नटराजन, के विग्नेश, एम मोहम्मद आणि मुरुगन अश्विन या खेळाडूंनी विजय हजारे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली होती.
तामिळनाडूचा संघ खालीलप्रमाणे आहे:
दिनेश कार्तिक (कर्णधार), विजय शंकर (उपकर्णधार), मुरली विजय, एन जगदीशन, सी हरी निशांत, बाबा अपराजित, एम शाहरुख खान, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, आर साई किशोर, टीम नटराजन, जी पेरियास्वामी, के विग्नेश, एम मोहम्मद, जे कौशिक .