एहसान मनी, सौरव गांगुली (Photo Credit: Getty/IANS)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) प्रमुख एहसान मनी (Ehsan Mani) यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा आशिया चषक (Asia Cup) 2020 पाकिस्तानऐवजी दुबई येथे आयोजित करणार असल्याचा दावा फेटाळून लावला. गांगुलीने शुक्रवारी सांगितले होते की यावर्षी दुबईमध्ये एशिया कप स्पर्धेचे आयोजन केले जाईल आणि त्यात भारत-पाकिस्तान दोघेही सहभागी होतील. परंतु पीसीबीने (PCB) शनिवारी स्पष्ट केले की आशियाई क्रिकेट कौन्सिलला (एसीसी) यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आणि यावर्षी ही स्पर्धा कोठे खेळली जाईल याचा निर्णयही तेच घेतील. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार असल्याने यंदा आशिया चषक टी-20 फॉर्मेटमध्ये खेळलं जाईल. मनी म्हणाले की, आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. (Asia Cup 2020: दुबईमध्ये होणार आशिया चषक, भारत आणि पाकिस्तान संघांच्या समावेशावर BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ने केला खुलासा)

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले की, पाकिस्तान बोर्ड आशिया चषक स्पर्धेचे यजमान आहे, परंतु एसीसी त्यावर निर्णय घेईल आणि सर्व देशांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल. आशिया चषक 2020 चं यजमानपद पाकिस्तानकडे सोपविण्यात आले आहे परंतु बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. बीसीसीआयने म्हटले होते की पाकिस्तानने स्पर्धेचे आयोजन केल्याने त्यांना काही हरकत नाही पण दोन देशांमधील तणावाच्या संबंधांमुळे ते आपल्या खेळाडूंना पाकिस्तानात खेळण्याची संमती देऊ शकत नाही.

आशिया चषक 2020 च्या जागेविषयी अंतिम निर्णय 3 मार्च रोजी दुबई येथे एसीसीच्या बैठकीत घेण्यात येणार असून तेथे गांगुली आणि मनी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये जेव्हा भारताने आशिया चषकचे आयोजन केले होते, तेव्हा पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी दुबई आणि अबूधाबी या पर्यायी ठिकाणी स्पर्धा खेळण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने अंतिम सामन्यात बांग्लादेशला पराभूत करून चषक जिंकला.