Video : 71 वर्षांचा रेकॉर्ड मोडत, टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर भारतीय संघाने असे केले सेलिब्रेशन
भारतीय संघाचे सेलिब्रेशन (Photo: screen grab)

तब्बल 71 वर्षांचा रेकॉर्ड मोडत, भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकली. या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे जगभरातून कौतुक होत आहे. या विजयासोबत भारतीय संघ हा ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 1947-48 मध्ये लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यानंतर आज हा विजय प्राप्त झाला आहे. चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा किताब देण्यात आला. यावेळी हा विजय क्षण भारतीय टीमने मोठ्या उत्साहात, मैदानावरच डान्स करत साजरा केला.

सिडनी कसोटी सामन्यात पावसामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. पाचव्या दिवशी दोन्ही पंचांनी कर्णधाराच्या सहमतीने सामना अनिर्णित झाल्याचे घोषित केले. या याचबरोबर भारताने 4 सामन्यांची ही सिरीज 2-1 ने जिंकली. यावेळी भारतीय टीमने हा आनंद असा साजरा केला.

टीम ही इंडियाचा हा जल्लोष आणि उत्साह हॉटेल मध्ये गेल्यावरही तसाच होता. भारत आर्मीने मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचे हॉटेलमध्ये ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. भारतीय संघानेही आपल्या आगळ्या वेगळ्या नृत्याने त्या क्षणाला साथ दिली. यावेळी सर्व खेळाडू ‘मेरे देश कि धरती’ या गाण्यावर थिरकले. तसेच या व्हिडीओमध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशांत शर्मा असे सर्वच खेळाडू भारतीय झेंडे घेऊन नाचताना दिसत आहेत. याचसोबत संघाचा लोकप्रिय नागीण डान्सही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो. या नृत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विजयाबाबत बोलताना कर्णधर कोहलीने हे माझे आजवरचे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले आहे. यावेळी मैदानावर उपस्थित असलेल्या अनुष्काला मिठी मारत कोहलीने हा क्षण साजरा केला. दरम्यान, आता भारतीय संघ 2019 च्या वर्ल्डकपच्या तयारीला लागणार आहे. त्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.