विराट कोहली (Photo Credit: PTI)

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही आयसीसी विजेतेपद मिळवून दिलेले नाही. यावेळी टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपवण्याचा त्याचा प्रयत्न होता पण तसे झाले नाही. या संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. या स्पर्धेत संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. विराट कोहलीची बॅटही फारशी चालली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. आफ्रिदीला वाटते की भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधाराची भूमिका सोडली पाहिजे.

समा टीव्ही चॅनल'वर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, "विराट कोहली भारतीय क्रिकेटचा महत्वाचा भाग आहे. तो एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. परंतु, त्यानं कर्णधारपदं सोडून उर्वरित क्रिकेटचा आनंद घ्यावा. त्याला अजून बरंच क्रिकेट खेळायचं आहे. जर त्यानं उर्वरित फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं तर, तो फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करू शकेल", असंही आफ्रिदीनं म्हटलंय. (हे ही वाचा National Sports Awards 2021: राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 चे वितरण, येथे पहा विजेत्यांची लिस्ट.)

एका चांगल्या कर्णधाराकडे जे गुण हवेत ते रोहितकडे आहेत, रोहितकडे मानसिक ताकद आहे आणि त्याने ती त्याच्या आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दाखवून दिली आहे. तो म्हणाला, “मी रोहितसोबत एक वर्ष खेळलोय आणि तो एक मजबूत मानसिकता असलेला अद्भुत खेळाडू आहे. त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला हवं तेव्हा तो रिलॅक्स राहतो. तसेच जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तो आक्रमकता देखील दाखवू शकतो.

विराटनं भारतीय टी-20 संघाचं आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरूच्या कर्णधारपद सोडलंय. एवढंच नव्हे तर, कोहली एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही सोडू शकतो असं नुकतंच मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपलेल्या रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत सूचित केलंय.