ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार प्रा. रा.रं.बोराडे यांचे आज, 11 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला होता. ‘पाचोळा’कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोराडे यांनी केवळ साहित्यक्षेत्रात नव्हे, तर शिक्षण आणि साहित्य प्रसाराच्या माध्यमातूनही मोठे योगदान दिले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी ग्रामीण ग्रंथालयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. नुकताच रा.रं.बोराडे यांना मराठी साहित्यातील भरीव कामगिरी केल्याबद्दल भाषा विभागातर्फे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. ‘पाचोळा’, ‘आमदार सौभाग्यवती’ ‘चारापाणी’ अशा अनेक कादंबऱ्या, यासह कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा या कथासंग्रहासह ‘शिका तुम्ही हो शिका’ ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य बोराडे यांनी लिहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, 1989 साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. (हेही वाचा: कर्जाचा बोजा असह्य झाल्याने आत्महत्या करणार्या संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांचा मदतीचा हात; फेडलं सारं कर्ज)
Veteran Writer R. R. Borade Passes Away:
प्रख्यात लेखक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा.रं.बोराडे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
बोराडे यांनी १९६२ साली लिहिलेल्या ‘पेरणी’ते‘ताळमेळ’,‘मळणी’,‘वाळवण’,‘राखण’,‘गोधळ’,‘माळरान’,‘बोळवण’,’वरात’,‘फजितवाडा’,… pic.twitter.com/z2rbjbskAz
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 11, 2025
मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन व बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार असलेल्या प्रा. रा. रं. बोराडे यांचे निधन या चळवळीची हानी आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे pic.twitter.com/u8ZUTbqbZq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)