Late Shirish More and Eknath Shinde PC: X @Devendra Fadnavis and Ajit Pawar

संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे (Shirish More) यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकजण हळहळले. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. शिरीष मोरे यांच्या सुसाईड नोट मध्ये असलेल्या 32 लाखांच्या कर्जाची रक्कम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या कुटुंबियांना देत त्यांच्या खांद्यावरून कर्जाचा बोजा उतरवला आहे.

एकनाथ शिंदे यांची आर्थिक मदत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी मोरे कुटुंबाला सुपूर्त केली. देहू येथील मोरे कुटुंबाच्या राहत्या घरी संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष मोरे यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं.

शिरीष मोरे यांनी भावी पत्नीसह आई-वडिलांना वेगवेगळी पत्र लिहित आर्थिक विवंचनेमधून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे.

शिरीष मोरे यांनी कोविड पूर्वी पेपर बॅग बनवण्याचा आणि प्रिटिंग व्यवसाय सुरू केला होता पण लॉकडाऊन लागला आणि या व्यवसायामध्ये त्यांना तोटा झाला. नंतर त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये उतरत पिंपरी चिंचवड मध्ये  नादब्रम्ह इडली ची फ्रांचायजी विकत घेत व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी काही कर्ज आणि घर बांधण्यासाठी काही पैसे आणि चार चाकी विकत घेण्यासाठी पैसे उसने घेतले होते. हा कर्जाचा बोजा सहन न झाल्याने अखेर शिरीष यांनी काही दिवसांपूर्वी राहत्या घरीच उपरणाने गळा आवळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वारकरी संप्रदायाचा वसा पुढे नेणार्‍या शिरीष मोरे यांनी अनेक ठिकाणी कीर्तन सेवा मोफत दिली आहे.

एकनाथ शिंदे यांचा कालच (9 फेब्रुवारी) 61 वा वाढदिवस झाला आहे. या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोरे कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदत करत त्यांच्यावरील सारं कर्ज दूर केले आहे.