केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला राज्यातील अवैध बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली येथून महाराष्ट्राच्या गृहविभागाला पाठवलेल्या अधिकृत पत्राद्वारे हे निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला अनुसरून गृहमंत्रालयाने राज्य सरकारला कायदेशीर उपाययोजनांसाठी निर्देश दिले आहेत. शिवाय, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (TISS) तयार केलेल्या अहवालाच्या आधारे हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेतला गेला आहे.

नुकतेच 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर एका बांगलादेशी घुसखोराने चाकूने सहा वार केले होते. मोहम्मद शहजाद या अवैध घुसखोराला 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आणि तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेनंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. शिवसेना (UBT), काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले. आता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर वाढलेल्या राजकीय आणि सामाजिक दबावामुळे केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत आहेत. गृहमंत्रालयाचे आदेश आणि तपासणीसाठी ठोस उपाययोजना केल्याने बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हाताळण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Milind Deora on Illegal Bangladeshi Immigrants: 'बेकायदेशीरपणे मुंबईत राहणार्‍या बांग्लादेशींना ताबडतोब बाहेर काढा' शिवसेना खासदार Milind Deora यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी)

बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे केंद्राचे महाराष्ट्राला निर्देश-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)