आठवड्यातील सर्वात वाईट दिवस कोणता? असा प्रश्न विचारल्यावर बहुतेक जण सोमवारचे (Monday) नाव घेतील. शनिवार, रविवार असे दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर प्रत्येकाचीच सोमवारी ऑफिसला, कामावर किंवा शाळेत जायची अजिबात इच्छा नसते. आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) अधिकृतपणे सोमवार हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस घोषित केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सोमवारी एका ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.
या ट्विटमध्ये लिहिले की, ‘आम्ही सोमवार या आठवड्यातील सर्वात वाईट दिवस म्हणून घोषित करत आहोत.’ त्यांनी सांगितले की, सोमवारचा क्रमांक शनिवार आणि रविवार नंतर येतो, याचा अर्थ दोन सुट्ट्यांनंतर सोमवार येतो. या दिवशी लोकांना ऑफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी जाण्यास कंटाळा येतो. बरेचदा लोक सोशल मीडियावर लिहितात की सोमवारी कामाचा बोजा जास्त असतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन गिनीज बुकने सोमवारला सर्वात वाईट दिवस ठरवले आहे.
we're officially giving monday the record of the worst day of the week
— Guinness World Records (@GWR) October 17, 2022
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटर वापरकर्त्यांना या बातमीनंतर आनंद झाला आहे की, शेवटी कोणीतरी त्यांच्या मनातील गोष्ट ओळखली. एका यूजरने लिहिले की, 'तुम्हाला हे घोषित करायला खूप वेळ लागला.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. म्हणून मी सोमवारी सुट्टी घेतो.’ (हेही वाचा: Biggest Egg In India Video: अंडे का फंडा! कोल्हापुरात सापडलं देशातील सर्वात मोठं अंड, पहा व्हिडीओ)
मात्र काही वापरकर्ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या या ट्विटशी सहमत नसल्याचे दिसत आहे. ते म्हणतात की सोमवारची वाट पाहणारे बरेच लोक आहेत कारण या दिवसापासून आठवडा सुरू होतो. लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समर्पण आणि उत्कटतेने पुन्हा काम सुरू करण्यासाठी सोमवारची प्रतीक्षा करतात. डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या 2,000 लोकांच्या अभ्यासानुसार, तीनपैकी एकाला आठवड्यातील इतर दिवसांच्या तुलनेत सोमवार अजिबात आवडत नाही.