आज 2024 वर्षाचा शेवटचा दिवस. मध्यरात्रीपासून 2025 वर्षाला सुरुवात होईल. अशात, 1 जानेवारी 2025 रोजी जगाची लोकसंख्या (World Population) किती असेल हे सांगणारा एक यूएस अहवाल समोर आला आहे. यामध्ये 2024 मध्ये लोकसंख्या किती वाढली हेही सांगण्यात आले आहे. जानेवारीमध्ये जगातील जन्मदर आणि मृत्यूदर किती असेल याबाबतही माहिती देण्यात आली आहे. यूएस सेन्सस ब्युरोच्या अहवालानुसार, 1 जानेवारी 2025 रोजी जगाची लोकसंख्या 8.09 अब्ज होईल. तसेच 2024 मध्ये 12 महिन्यांत संपूर्ण जगाची लोकसंख्या 71 दशलक्षने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
सन 2024 मध्ये लोकसंख्या 0.9% वाढली आहे, जी 2023 च्या तुलनेत कमी आहे. 2023 मध्ये लोकसंख्या 75 दशलक्षने वाढली होती. यूएस सेन्सस ब्युरोच्या अहवालानुसार, 2025 मध्ये प्रति सेकंद 4.2 जन्म आणि 2.0 मृत्यू होतील असा अंदाज आहे. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर देशातील लोकसंख्या 2024 मध्ये 26 लाखांनी वाढली आहे. यूएस सेन्सस ब्युरोच्या अहवालानुसार, नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेतील लोकसंख्या 341 दशलक्षांपर्यंत पोहोचेल.
जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेत दर नऊ सेकंदाला एक व्यक्ती जन्माला येईल आणि दर 9.4 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होईल. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमुळे, अमेरिकेची लोकसंख्या दर 23.2 सेकंदाला एका व्यक्तीने वाढेल. जन्म, मृत्यू आणि स्थलांतरितांची संख्या एकत्र केल्यास, दर 21.2 सेकंदाला अमेरिकेच्या लोकसंख्येमध्ये एक व्यक्ती जोडली जाईल. (हेही वाचा: Generation Beta: आता Gen Alpha आणि Gen Z चा काळ झाला जुना; 2025 पासून येणार जनरेशन बीटा; जाणून घ्या काय असेल खास)
भारताची स्थिती-
सध्या भारत चीनला मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2025 मध्ये भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 0.9% असेल. 2025 मध्ये भारताची लोकसंख्या 146 कोटी होण्याची शक्यता आहे. भारतानंतर चीन हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. चीनची लोकसंख्या अंदाजे 140.8 कोटी आहे. भारत आणि चीननंतर अमेरिका हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. 1 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेची लोकसंख्या 341 दशलक्ष होईल. त्याच वेळी, जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश व्हॅटिकन सिटी आहे, त्याची लोकसंख्या 2024 मध्ये 764 इतकी मोजली गेली आहे.