अहमदाबाद: डास चावला म्हणून बायको चिडली, नवऱ्याला मुसळाने बदडले
Husband-Wife | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

नवरा-बायको (Husband-Wife) यांच्या भांडणात खरे तर इतरांनी पडू नये असे म्हटले जाते. त्याला कारणंही तशीच असतात. कारण, त्या दोघांमधील भांडण म्हणजे लुटूपुटूची लढाई असते. आता भांडताना दिसतील पण, थोड्याच वेळात त्यांचे पुन्हा गळ्यात गळे पाहायला मिळतील. पण, प्रकरण जेव्हा पोलिसांत पोहोचते आणि भांडणाचे कारण सोबतच प्रकारही काहीसा विचित्र असेल तर त्याची नोंद घ्यावीच लागते. अशीच एक घटना गुजरात (Gujarat) राज्यातील अहमदाबाद (Ahmedabad) शहरात घडली आहे. इथल्या एका जोडप्यांमध्ये भांडण झाले. या भांडणात पत्नीने आपल्या पतीला चक्क मुसळाने बदडले. विशेष म्हणजे केवळ डास (Mosquito) चावला म्हणून पत्नीने पतीला बदडले.

प्राप्त माहितीनुसार, भूपेंद्र लेउवा हा व्यक्ती आपली पत्नी संगिता आणि मुलगी चितल यांच्यासोबत नरोदा परिसरात राहतो. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी की, भूपेंद्र लेउवा हा आपल्या कारमधून एलईडी बल्ब विक्रीचा व्यवसाय करतो. या व्यवसायातून त्यांचे उत्पन्न अत्यंत मर्यादित आहेत. उत्पादनच कमी असल्यामुळे भूपेंद्र हा गेली दोन महिने आपले विजबील भरु शकला नाही. परिणामी त्यांच्या घरातील वीजपूरवठा प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे घरामध्ये रात्रीच्या वेळी डास येतात.

पुढे बोलताना पोलिसांनी सांगितले की, भूपेंद्र लेउवा हा आपल्या पत्नी आणि मुलीसोबत झोपला होता. ही घटना बुधवारी पहाटेची आहे. पहाटेच्या वेळी पत्नी संगिताने भूपेंद्र याच्याकडे तक्रार केली की, डास खूपच चावत आहेत, झोपच लागत नाही. यावर पती भूपेंद्र लेउवा याने पत्नी संगिताची खिल्ली उडवत म्हटले की, 'तू माझ्या बाजूला येऊन झोप मग तुला डास चावणार नाहीत'. पतीचे वक्तव्य ऐकून संगिता भलतीच चिडली. ती झोपल्या जागेवरुन तडक उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन तिने मुसळ आणले. ती इतक्यावरच थांबली नाही तर, तिने हातातल्या मुसळाने पती भूपेंद्र याला बदडायला सुरुवात केली. यात भूपेंद्र हा गंभीर जखमी झाला. त्याला सात टाकेही पडले. या घटनेत संगिता हिला तिची मुलगी चितल हिनेही मदत केली. दोघींनी मिळून भूपेंद्र याला बेदम मारहाण केली. (हेही वाचा, बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या)

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या भूपेंद्र याने छोटा भाऊ महेंद्र याला बोलवून घेतले. महेंद्र याने भूपेंद्र याची सुटका केली. तसेच, त्याची पत्नी संगिता हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली. भूपेंद्र याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, त्याच्या डाव्या डोळ्यांना 7 टाके घालण्यात आली आहे. महेंद्र आणि भूपेंद्र लेउवा यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी पत्नी संगिता आणि तिच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.