हॉप-शूट्स भाजीच्या शेतीचा दावा खोटा (Photo Credits: Twitter)

बिहारमध्ये (Bihar) नुकताच प्रति किलो सुमारे एक लाख रुपये दराने विकल्या जाणार्‍या भाजी (Vegetable) चा दावा करण्यात आला होता. ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर लोकांचा असा विश्वास होता की, बिहारमधील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील व्यक्तीने जगातील सर्वात महागड्या भाजीचे (Worlds Most Expensive Vegetable) पिक घेतले आहे. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू (IAS Officer) यांनीही या व्यक्तीचे फोटो शेअर करत बिहारमधील एक शेतकरी जगातील सर्वात महागडी भाजी हॉप-शूट्स (Hop-Shoots) ची शेती करीत असल्याची माहिती दिली होती. परंतु, जेव्हा या दाव्याची चौकशी केली गेली, तेव्हा हा दावा पूर्णपणे खोटा ठरला.

आयएएस सुप्रिया साहू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, 'बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी अमरेश सिंग जगातील सर्वात महागडी भाजी हॉप-शूटची शेती करीत आहे. या भाजीची प्रतिकिलो किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे. अमरेश सिंग हा या भाजीची लागवड करणारा भारतातील पहिला शेतकरी आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी हा गेम चेंजर ठरू शकतो.' (वाचा - कावळ्याने आपल्या चोचीच्या साहाय्याने उचलला कचरा; पक्षाच्या या कामाने जिंकली नेटीझन्सची मनं (Watch Viral Video))

वास्तविक, जेव्हा हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणने या दाव्याची चौकशी केली तेव्हा तपासणीमध्ये असे कोणतेही शेत किंवा अशी कोणतीही भाजी आढळली नाही. हॉप-शूट्स लागवडीचा दावा करणारे शेतकरी अमर सिंग यांच्याकडून याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सांगितले की, हे पीक जवळपास 172 किलोमीटर अंतरावर नालंदा जिल्ह्यात आहे. परंतु, वृत्तपत्र पथक नालंदा येथे पोचल्यावर त्यांनी हे पीक औरंगाबादमध्ये असल्याचं सांगितलं. यानंतर औरंगाबादच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या पिकाबद्दल विचारले असता, औरंगाबाद जिल्ह्यात अशी शेती नसल्याचे दिसून आले. असं सांगितलं जात आहे की, अमरेश सिंग यांनी काळ्या भाताचे आणि गव्हाचे पिक घेतले आहे. त्यांनी हॉप-शूट्सचे कोणतेही पीक घेतलेले नाही.

हॉप-शूट्स ही बारमाही वनस्पती आहे, जी उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आढळते. ही भाजी बीअरमध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून वापरली जाते. या व्यतिरिक्त, या भाजीचा वापर हर्बल औषधांमध्ये आणि खाद्यपदार्थात भाजी म्हणून केला जातो. या भाजीमध्ये शरीरात कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता आहे. म्हणूनच या गुणधर्मांमुळे ही जगातील सर्वात महाग भाजी आहे.