Pakistani anchor Viral Video during Earthquake (PC - Twitter)

Earthquake Viral Video: पाकिस्तानात 21 मार्चच्या रात्री जोरदार भूकंप होऊनही एका वृत्तवाहिनीचा अँकर लाईव्ह बातम्या वाचत राहिला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही व्हायरल क्लिप पाकिस्तानमधील पत्रकार इफ्तिखार फिरदौस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. ही क्लिप पेशावरच्या पश्तो भाषेतील स्थानिक टीव्ही चॅनल महश्रिक टीव्हीची आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे संपूर्ण न्यूज स्टुडिओ हादरत असल्याचं या क्लिपमध्ये दिसतंय, पण न्यूज अँकर त्याची पर्वा न करता थेट भूकंपाची माहिती प्रेक्षकांना देत आहे. अँकरभोवती हलणाऱ्या गोष्टी कॅमेराने रेकॉर्ड केल्या आणि त्या लाइव्ह टीव्हीवर दिसल्या.

दरम्यान, 39 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक न्यूज अँकर बातमी वाचत आहे, तेव्हाच जोरदार हादरे जाणवतात. या हादऱ्यामुळे अँकरमागील संपूर्ण न्यूजरूम हलते. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जोरदार धक्क्यांनंतरही अँकर कोणतीही भीती न बाळगता आणि जीवाची पर्वा न करता बातम्या लाईव्ह वाचत राहतो. (हेही वाचा - Earthquake In Pakistan: भूकंपाने पाकिस्तान हादरला; खैबर पख्तूनख्वामध्ये 9 जणांचा मृत्यू; अनेक घरांचे नुकसान)

त्याचवेळी न्यूजरूममध्ये उपस्थित असलेले बाकीचे लोक जीव वाचवून पळू लागतात. भूकंपानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. लोक अँकरच्या शौर्याचे आणि संयमाचे कौतुक करत आहेत.

तथापी, 21 मार्च रोजी उत्तर भारतात तसेच शेजारील देश पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. येथील 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपात मृतांची संख्या नऊ झाली आहे तर 100 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 133 किमी आग्नेयेला होता.