अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट (संग्रहित संपादित प्रतिमा)

काही दिवसांपूर्वी मुंब्य्रातील (Mumbra) नव्याने बांधलेल्या रस्त्यावर सहा तरुणांनी एकाच मोटरसायकलवरून स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता रॅश ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी वडील आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाचा शोध घेण्यासाठी मुंब्रा वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे सहा तरुण एका रस्त्यावर विना हेल्मेट गाडी चालवत स्टंटबाजी करत होते. एमएच 04 जेपी 4022 असा या मोटारसायकलचा क्रमांक होता, ज्याच्या आधारे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.

वाहनाची नोंदणी मुंब्रयातील कौसा येथील रहिवासी मनोजकुमार गुप्ता यांच्या नावाची असल्याचे समोर आले. त्त्यानंतर पोलीस त्यांच्या घरी पोहोचले व मोटारसायकलची खात्री करून घेतली. मनोजकुमार गुप्ता यांचा 19 वर्षीय मुलगा प्रीतम याने मोटरसायकल चालवली होती. प्रीतम हा त्याच्या आणखी पाच मित्रांसह हेल्मेटशिवाय गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रीतमकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

प्रीतमसोबतच ज्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नव्हता अशा व्यक्तीला मोटारसायकल दिली म्हणून त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि मोटार वाहन कायदा कलम 3, 4, 5, 128, 129, 180, 181, 184, 190 (2) आणि 194 अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Noodles Knitting: नूडल्स विणकाम, कला तर पाहा, व्हाल अवाक (Video))

याबाबत ठाणे वाहतूक पोलिसांचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘दंडाची नुकतीच वाढलेली किंमत पाहता, त्यांना भरावी लागणारी दंडाची रक्कम ही वाहनाच्या किमतीपेक्षा जास्त असेल हे स्पष्ट झाले आहे. आम्ही त्यांचा परवाना निलंबित करू. घडल्या प्रकारानंतर, प्रीतमचे वडील मनोजकुमार गुप्ता यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते आपल्या मुलाच्या वागण्यावर नाराज असल्याचे दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी पालकांना आवाहन केले आहे की, जी मुले स्टंट करतात त्यांना गाडीच्या चाव्या देणे टाळा.