![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/12/17-180-1-.jpg?width=380&height=214)
Navi Mumbai Accident: नवी मुंबईमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाशी (Vashi) मध्ये स्कूटर (Scooter) आणि कारची धडक झाली. या अपघातात (Accident) 2 महिलांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी 6:45 वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. कामोठे येथील रहिवासी संस्कृती खोकले (वय, 22), वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. तथापी, गंभीर जखमी झालेल्या अंजली पांडे (वय, 22) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल -
तुर्भे एमआयडीसीमधील बीपीओमध्ये काम करणाऱ्या या दोन्ही महिला रात्रीची शिफ्ट पूर्ण करून घरी जात होत्या. कोपरी पुलावरील ट्रॅफिक सिग्नलजवळ हा अपघात झाला. स्कूटर आणि कारमध्ये समोरासमोर टक्कर झाली. एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी कार चालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचा नोंदणी क्रमांक मिळाला आहे, ज्यावरून मालक डोंबिवली येथे राहतो हे स्पष्ट झाले आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. (हेही वाचा -Nashik Mumbai Highway Accident: नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू)
घोडबंदर रोड अपघात -
सोमवारी पहाटे ठाणे पश्चिमेला महिंद्रा अँड महिंद्रा पिकअप ट्रकचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला. घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्कजवळ पहाटे अल्पवयीन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सकाळी 7:34 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, साई कृष्ण मनोज बिस्वाल असे या अल्पवयीन चालकाचे नाव असून तो मुंबईकडे जात होता. यावेळी ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मेट्रो बांधकामाच्या खड्ड्यात कोसळला.