देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पुतण्या तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) याने कोरोना लस (Corona Vaccine) घेतली. यावरुन जोरदार टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय याने घेतलेल्या लसीवरुन स्पष्टीकरणही दिले आहे. तसेच, तन्मयने सोशल मीडियावर शेअर केलेले लस घेतानाचे फोटोही डिलीट केले आहे. असे असले तरी सोशल मीडियातून मात्र त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. काही युजर्सनी तर थेट मिम्स करुनच त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तन्मय फडणवीस याच्यावर टीका तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावरुन ‘चाचा विधायक है’ ते ‘हमारा भतीजा है ये इम्पॉर्टन्ट है’ अशा प्रकारची विविध वाक्ये वापरत तन्मय सध्या सोशल मीडियात ट्रोल होतो आहे.
कोण आहे तन्मय फडणवीस?
तन्मय फडणवीस हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे. तो नात्याने देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या लागतो. शोभा फडणवीस या विधान परिषद आमदार आणि माजी मंत्रीही राहिल्या आहेत. (हेही वाचा, Devendra Fadanvis On Tanmay Fadnavis Controversy: देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टीकरण, पुतण्या तन्मय फडणवीस याच्याकडून कोरोना लस घेतानाचे फोटोच डिलीट)
तन्मय याने कोरोना लस घेतल्यावर टीका करत काँग्रेसने म्हटले होते की, ''45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!'' याशिवाय ''फडणवीस यांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का? फ्रण्टलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी?'', असे सवालदेखील काँग्रेसने उपस्थित केले होते.